सातारा : कास पठारावरील फुलोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे सातारा-कास रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पर्यटकांची एकच गर्दी झाल्याने कास पठाराला जत्रेचे स्वरूप आले आहे. ऑनलाइन आरक्षण करूनच पठारावर येण्याचे केलेले आवाहन पर्यटकांनी झिडकारून मोठ्या संख्येने पर्यटक कास पठारावर दाखल झाले आहेत. त्यामुळे सातारा-कास रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
कास पठारावर फुलांचे गालीचे मोठ्या प्रमाणावर बहरले आहेत. हा निसर्ग सोहळा अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांनी कासकडे धाव घेतल्याने कास पठाराला पर्यटकांच्या जत्रेचे स्वरूप आले आहे. त्यातच आज रविवारी सातारा हाफ हिल मॅरेथॉन होती. त्यामुळे मॅरेथॉन आणि कासचे पर्यटक अशी मोठ्या प्रमाणावर दुहेरी गर्दी सातारा-कास रस्त्यावर पाहायला मिळाली. घाटाई फाट्यावरील वाहन तळावर सातारा शहराकडून येणारी वाहने संपूर्ण रस्त्यात अडकली. त्यातच कास पठारावरून सातारा शहराकडे येणाऱ्या वाहनांना रस्ता सोडला जात नव्हता.
त्यामुळे सकाळी दहानंतर या मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली. एकेरी वाहतुकीचा पर्याय पोलीस प्रशासनाने करूनही हा पर्याय अपयशी ठरला. एवढी मोठी गर्दी पठारावर झाली आहे. एकेरी वाहतूक फक्त कास पठार, कास तलाव ते घाटाईमार्गे पुन्हा सातारा रस्त्यावर येत असल्याने वाहने तिथेच अडकून पडली आहेत. त्यातच घाटाईमार्गे साताऱ्याकडे जाताना घाटाई फाट्यावरील वाहनतळ असल्याने गोल फिरून वाहने सर्व एका ठिकाणी येत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता. या गर्दीने कास पठारावरील सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या.
नोंदणी आवश्यक
जागतिक वारसा स्थळ कास पठारावर सुमारे ८५० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. ज्यात अनेक दुर्मीळ फुलांचा समावेश आहे. विविध १३२ प्रजातींची रंगीत फुले फुलली आहेत. कास पठारावर सध्या टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, अभाळी, भुईकारवी, सोनकी, तेरडागेंद, कारवी, चवर, वायुतुरा, सीतेची आसवे, धनगरी फेटा, सोनकी, टॉपली करवी आणि पांढरी बकुळी, विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदाणी, गुलाब बाभूळ यांसारखी रंगीत फुले फुलली आहेत. सप्टेंबरच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कास पठाराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. कास पठाराला येत असताना http://www.kas.ind.in या वेबसाईटला ऑनलाइन नोंदणी करून येण्याचे आवाहन वन विभागाने व कास पठार कार्यकारी समितीने केले आहे.
पर्यायी मार्गाची गरज…
साताऱ्याकडून येणारी कास पठारावर घाटाई फाटा व कास तलाव वाहनतळ मेढा सातारा अशी वाहतूक वळविल्यास वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊ शकते, असे स्थानिकांनी सांगितले.