कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात सुरू असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह पंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामे कोणत्याही परिस्थितीत मुदतीत, गतीने पूर्ण करा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्यावा. या कामात विलंब आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. कामांच्या ठिकाणांना वेळोवेळी भेटी देऊन दर महिन्याला जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.

पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल. विभागप्रमुखांनी सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी भेटी देऊन कामाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेऊन प्रगतीचा आढावा घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

दोन्ही महानगरपालिका, प्रदूषण विभाग, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती बैठकीत दिली.