कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यांच्यावर हैद्राबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या आठ दिवसांपासून चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार चंद्रकांत जाधव यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये करोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांना त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. त्यावर स्थानिक रुग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबाद मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान रक्तदाब कमी झाल्याने त्यांचे निधन झाले.

उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांनी मोठे यश मिळवले होते. उद्योजकांचे प्रश्न धसास लावणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख जिल्ह्यामध्ये होती. चंद्रकांत जाधव यांचे फुटबॉल खेळावर निस्सीम प्रेम होते. कोल्हापुरातील तालीम मंडळांचे ही ते हितचिंतक होते. बुधवारी दुपारी त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार आहे.

चंद्रकांत जाधव यांचे जाधव इंडस्ट्रिज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेजेस, जाधव मेटल्स, प्रेमला इंडस्ट्रिज असे उद्योग आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांनी लौकिक मिळवला होता.

विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे</strong>

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही शोक व्यक्त केला आहे. “मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनीही चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “उत्तर कोल्हापूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक – उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील, आग्रही राहणारा लोकप्रतिनिधी हरपला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली,” असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

चंद्रकांत जाधव यांची राजकीय वाटचाल

चंद्रकांत जाधव व त्यांच्या परिवाराचा कोल्हापूरला आजच्या राजकारणातील वावर विरोधक म्हणून राहिला होता. यापूर्वी त्यांनी एकदा महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी उमेदवारी मागितली होती, पण ती नाकारली गेली. त्यानंतर त्यांनी भाऊ संभाजी यांना तीन वेळा तर गतवेळी बंधूसह पत्नी प्रेमला यांना महापालिका निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आणले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेचे दोन वेळा विजयी झालेले आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur congress mla chandrakant jadhav passes away abn
First published on: 02-12-2021 at 08:38 IST