कांद्याची आवक वाढल्याने राज्यात अनेक ठिकाणी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावं लागत आहे. कांदा लागवडीचा खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. अशात सोलापूरमधील एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांद्याच्या मोबदल्यात केवळ २ रुपयांचा धनादेश मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. राजेंद्र तुकाराम चव्हाण, असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी ‘रोड शो’ करत फिरलेलं…”, अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला!

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बोरगाव येथे राहणारे ५८ वर्षीय राजेंद्र चव्हाण हे आपला ५१२ किलो कांदा घेऊन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावासाठी पोहोचले होते. यासाठी त्यांनी ७० किलोमीटर प्रवास केला. मात्र, त्यांच्या कांद्याला केवळ १ रुपये प्रतिकिलो एवढा दर मिळाला. त्यानंतर सर्व कपात करून २ रुपयांचा धनादेश त्यांच्या हातात दिला गेला.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “मला ५१२ किलो कांद्यासाठी प्रतिकिलो १ रुपया दराने भाव मिळाला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्याने वाहनभाडे, हमाली आणि तोलाई याचे पैसे वजा करून दोन रुपयांचा चेक माझ्या हातात दिला. मागील तीन ते चार वर्षात खतं, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. ५१२ किलो कांद्यासाठी मी ४० हजार रुपये खर्च केले. मात्र, नफा तर सोडा साधा लागवडीचा खर्चही निघाला नाही. ही एकप्रकार शेतकऱ्याची थट्टा आहे.”

हेही वाचा – “MPSC करणारी मुलं नंतर चहाचं दुकान टाकतात”, विद्यार्थ्यांनी खंत बोलून दाखवताच शरद पवार म्हणाले, “सरकारी नोकरीशिवाय..”

यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी नासीर खलिफा यांनीही प्रतिक्रिया दिली. “आम्ही संगणकीय प्रणालीद्वारे पावती आणि धनादेश देतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. यापूर्वीही आम्ही अशा कमी रकमेचे धनादेश आम्ही दिले आहेत. राजेंद्र चव्हाण यांनी आणलेला कांद्याचा दर्जा थोडा कमी होता. त्यामुळे त्यांच्या कांद्याला भाव मिळालेला नाही. यापूर्वी आम्ही त्यांना १८ रुपये प्रतिकिलो दराने भाव दिला आहे”, असे ते म्हणाले.

दरम्यान, यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केलं. “राज्यकर्त्यांनो आता तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, ते बघा”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच “निर्लज्ज व्यापाऱ्यांना दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur farmer get two rupee after 512 kg onion selling raju shetty reaction spb