कोल्हापूर : कोल्हापूर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले असताना स्पर्धेत असलेले हर्षल सुर्वे, तसेच उपनेते संजय पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याबाबत सोमवारी भूमिका जाहीर करणार असल्याचे शनिवारी पत्रकारांना सांगितले.

कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उपनेतेपद देण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवीन जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाने शोध सुरू केला होता. शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे, विराज पाटील, राजू यादव हेही या स्पर्धेत होते. तथापि, सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंगवले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.

या निवडीनंतर बोलताना इंगवले यांनी शिवसेनेतील मरगळ दूर करून पक्ष वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रभाग रचनेत मतदारांची घुसखोरी झाली नाही तर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळेल, असा दावा केला. सुर्वेंची टीकेची तोफ तरी या निवडीवर टीकेची तोफ डागत हर्षल सुर्वे म्हणाले, की बनावटगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला आम्ही उरावर बसवून घेणार नाही. आमचे खांदे सुद्धा मजबूत आहेत. कोणाला उरावर घ्यायचे आणि कुणाला पायाखाली ठेवायचे हे आम्ही ठरवू, असा इशारा त्यांनी पक्षातील वरिष्ठांना दिला.