कोल्हापूर : नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्तीण अखेर गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाकडे रवाना झाली. ही हत्ती नेण्यास ग्रामस्थांसह भाविकांनी विरोध केला. संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. मात्र हा विरोध मोडून काढत हत्ती ताब्यात घेत तो गुजरातकडे रवाना केला. यावेळी मठाचे महास्वामींसह ग्रामस्थ आणि भाविकांना अश्रू अनावर झाले. दगडफेकप्रकरणी शंभराहून अधिक लोकांवर मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील जैन मठातील महादेवी हत्तिणीचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाने वनतारा पशुसंग्रहालयाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हत्ती येथेच ठेवण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरले होते. दरम्यान हत्तिणीला नेण्यासाठी वनताराचे पथक आल्यावर नांदणीमधील ग्रामस्थ काल रात्री रस्त्यावर उतरले. पथकाच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यात आली. यामध्ये दोन पोलीस गाड्यांचे नुकसान झाले. पोलिसांनी लाठीमार करून संतप्त जमावाला पांगवले. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता.

साश्रूपूर्ण निरोप

अखेर नांदणी मठात माधुरी उर्फ महादेवी हत्तिणीला निरोप देण्याची तयारी करण्यात आली. स्वस्तिश्री पट्टाचार्य महास्वामी यांनी हत्तिणीची पूजा केली. यावेळी मठाचे महास्वामींसह ग्रामस्थ आणि भाविकांना अश्रू अनावर झाले. हत्तिणीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. साश्रूपूर्ण वातावरणात तिला निरोप देण्यात आला.