Kunal Kamra On Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते सादर केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या प्रकरणात कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच या प्रकरणी कुणाल कामराविरोधात गुन्हा देखील दाखल झाला. त्यामुळे कुणाल कामरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. दरम्यान, आता कुणाल कामराने आज (२८ मार्च) मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याने राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य करत कारवाई करण्याचे संकेत दिले होते. तसेच कुणाल कामराच्या गाण्यावरील वादावार राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर मुंबई पोलिसांनी कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच चौकशीसाठी कुणाल कामराला नोटीस देखील बजावण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, यानंतर कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात ट्रान्झिट अॅन्स्टिपेट्री जामिनासाठी अर्ज केला केला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. तसेच या प्रकरणातील चौकशी दरम्यान अटकेपासून संरक्षण मिळण्याची मागणी देखील कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ दिला होता. यामध्ये कुणाल कामरा शोमध्ये म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली”, असं म्हणत कुणाल कामराने शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणंही सादर केलं होतं. मात्र, व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunal kamra files anticipatory bail application in madras high court and eknath shinde shivsena controversy gkt