सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली तालुक्यातील कसाल-कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका मालगाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीची धडक बसल्यानंतर गंभीर जखमी झालेला बिबट्या रेल्वे ट्रॅकजवळच्या झुडपांमध्ये लपून बसला होता. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शोधून काढले आणि जेरबंद करून उपचारांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या भागात वन्य प्राण्यांना जंगलात पुरेसे अन्न मिळत नसल्यामुळे ते अन्न आणि भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीच्या दिशेने येत आहेत. याच कारणामुळे अनेकदा असे अपघात घडत असल्याचेही सांगितले जात आहे.