सावंतवाडी : कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाजलेल्या शिक्षक विजयकुमार गुरव हत्या प्रकरणातील दोषी आरोपी सुरेश आप्पासो चोथे कारागृहातून पळून गेल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चोथेने कारागृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करत, कार वॉशिंग सेंटरवरून एका ग्राहकाची कार घेऊन पोबारा केला.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
गडहिंग्लज, कोल्हापूर येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी जयालक्ष्मी गुरव हिचे शेजारी राहणाऱ्या सुरेश चोथेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधात विजयकुमार गुरव अडथळा ठरत असल्याने, ६ नोव्हेंबर २०१७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबातील सर्व जण झोपेत असताना, जयालक्ष्मीने प्रियकर सुरेश चोथेच्या मदतीने राहत्या घरातच पती विजयकुमार यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटातील कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत फेकून दिला होता.
मध्यरात्री मृतदेह टाकल्यानंतर घटनास्थळी रक्ताचे डाग पडले होते, ज्यामुळे काहीतरी अघटित घडल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांना याची माहिती दिली. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बाबल आल्मेडा यांच्या टीमला कावळेसाद पॉईंटच्या खोल दरीत उतरवले असता, त्यांना एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह वर काढल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना दिली. त्यावेळी, दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले शिक्षक विजयकुमार गुरव यांच्याबद्दल माहिती समोर आली. तपास करत असताना पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि घटनेच्या अवघ्या चार ते पाच दिवसांतच पोलिसांनी विजयकुमार गुरव यांची पत्नी जयालक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना अटक केली.
या प्रकरणाची सुनावणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात झाली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आणि ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
आरोपीचा थरारक पलायन आणि पुढील तपास:
कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सुरेश चोथे आता कारागृहातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या या पलायनामुळे गडहिंग्लज येथील शिक्षक हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.
कोल्हापूर येथून चोरी झालेली कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी बाजारपेठेत आढळून आली आहे. ही कार बेवारस स्थितीत होती. ही कार कोल्हापूर येथील निवृत्त शिक्षकाची असून, ती कळंबा कारागृहातून पळवून आणल्याची माहिती समोर आली आहे. सुरेश चोथेने कारागृहाच्या कार सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत असताना, ड्युटीवर असलेल्या पोलिसांची नजर चुकवून ही कार घेऊन वैभववाडीच्या दिशेने पलायन केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. ही कार वैभववाडीत सोडून तो पुढे निसटला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वैभववाडी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस चोथेचा कसून शोध घेत असून, लवकरच त्याला पुन्हा जेरबंद करण्याची शक्यता आहे.