दापोली : मुंबई- गोवा महामार्गावर टँकर पलटी होण्याची मालिका काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे. गौरी-गणपती सणाकरीता प्रशासनाने अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.रविवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी गॅस कंटेनरने दोन वाहनांना धडक दिल्याने भोस्ते घाटात भीषण अपघात घडला.

जयगड वरून मुंबईच्या दिशेने जात असलेला एलपीजी गॅस कंटेनर (क्र. एपी १३ टीएच ७६५२) अचानक ब्रेक फेल झाल्याने नियंत्रणाबाहेर गेला. यावेळी वाहनाचे इंजिन बंद पडले व स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनर थेट समोरील गाड्यांवर आदळला. समोर असलेली तवेरा कार (क्र. एमएच ०५ एएक्स ७७६८) ही गणपतीपुळे वरून रायगड दर्शनासाठी निघाली होती, तर वॅगनार कार (क्र.एमएच ०५ एएस ००५७) चिपळूण वरून खेडच्या दिशेने जात होती. या दोन्ही वाहनांना कंटेनरने जबर धडक दिली. धडकेनंतर गॅस कंटेनर डिव्हायडरवर चढून दुसऱ्या बाजूला पलटी झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच श्री. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधाम यांच्याकडून अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी २४ तास तत्पर असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले.या अपघातामुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सुदैवाने गॅस कंटेनरमधून गॅस गळती झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.