सातारा : महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरु असून आता स्ट्रॉबेरी संदर्भात संशोधन केंद्रासही मान्यता मिळाली आहे. त्याचे काम लवकरच सुरु होणार असून याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होईल असे मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.
कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रति कुलपती कोकाटे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्री. कोकाटे म्हणाले, की महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरीचे मोठे नाते आहे. या भागातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना या पिकाच्या उत्पादनात नव्या संशोधनाअभावी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आता या नव्या संशोधन केंद्रामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांची सोय होईल.
दरम्यान गहू आणि स्ट्रॉबेरीवर संशोधन करण्यासाठी येथे येणारे शास्त्रज्ञ, परदेशी पाहुणे व शेतकरी याना राहण्यासाठी म्हणून नवे अतिथीगृह बांधले जात आहे. या नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीची जागा व आराखडा कोकाटे यांनी पहिला. यातील बारकावे समजून घेत अभियंत्यांना काही बदल कारण्यासह महाबळेश्वर पर्यटन स्थळास शोभेल असे दर्जेदार काम करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, विद्यापीठ अभियंता डॉ. मिलिंद ढोके, शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम, डॉ. मनीष सुशीर, डॉ. विक्रांत साळी, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह गहू गेरवा संशोधन केंद्रातील कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील अधिकारी कर्मचाऱ्यासह मान्यवर उपस्थित होते. हे अतिथीगृह शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यासाठी उपयोगी पडेल असे गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ दर्शन कदम यांनी सांगितले.