कराड : महाराष्ट्रात पर्यटनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. स्वित्झर्लंडमधील पर्यटकांचे महाराष्ट्रात नेहमीच स्वागत असल्याचे सांगत महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड  यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्याबाबत राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आवाहन केले. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून यासंदर्भातील माहिती प्रसिद्धीपत्रकाने देण्यात आली. त्यात म्हटले आहे की, स्वित्झर्लंडचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) मार्टिन मायर यांनी मुंबईत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई आणि विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यावेळी मंत्री शंभूराजेंनी भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वित्झर्लंडचे महावाणिज्यदूत मार्टिन मायर यांनी विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या कक्षात त्यांची व पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांतील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. मंत्री शंभूराज देसाई या वेळी बोलताना म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यापासून आजवर भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांचे एकमेकांना सहकार्य असते. त्याचबरोबर सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रातही दोन्ही देशांतील आदान, प्रदान वाढावे. महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने असे परस्पर सहकार्य कायमच महत्त्वाचे राहील, असा विश्वास मंत्री देसाई यांनी दिला. महावाणिज्यदूत मार्टिन मायर यांना पर्यटन विभागाकडून पर्यटन वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रमांची माहितीही याप्रसंगी देण्यात आली. तसेच एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे पर्यटन विभागाकडून आयोजित होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचेही मंत्री शंभूराज देसाई यांनी मार्टिन मायर यांना आमंत्रण दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra and switzerland talks to promote tourism development says shambhuraj desai zws