“कुणी कितीही प्रयत्न केले तरी…”, विधानसभा अध्यक्षांची विरोधकांवर टीका; आमदार अपात्रतेवर स्पष्ट केली भूमिका!

राहुल नार्वेकर म्हणतात, “ज्यांना संविधानाचं, नियमाचं ज्ञान नाही अशा लोकांनी केलेल्या टिप्पणीबद्दल बोलण्यात वेळ घालवणं योग्य नाही!”

rahul narvekar targets opposition party
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं विरोधकांवर टीकास्र (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आमदार अपात्रतेची सुनावणी चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर यासंदर्भात राहुल नार्वेकरांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं. मात्र, अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकरांकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यावर माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकाही केली.

विदेश दौऱ्यावरून राजकारण?

राहुल नार्वेकरांच्या विदेश दौऱ्यावरून गेल्या आठवड्याभरात मोठं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. सुनावणी प्रलंबित ठेवून नार्वेकर विदेश दौऱ्यावर जात असल्याची टीका विरोधकांनी केली होती. यासंदर्भात नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “माझा परदेश दौरा मी २६ तारखेलाच रद्द केला होता. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी परिषदेला उपस्थित राहणार नाही हे मी २६ तारखेलाच कळवलं होतं. पण २८ तारखेला त्यावर मोठी चर्चा घडवून आपणच हा दौरा रद्द करायला लावला असं चित्र लोकांसमोर आणायचा केविलवाणा प्रकार लोकांनी केला”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

“मी या धमक्यांना घाबरत नाही”

दरम्यान, यावेळी नार्वेकरांनी विरोधकांना लक्ष्य करताना आपण धमक्यांना घाबरत नसल्याची भूमिका मांडली. “अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी कायदा, नियम व संविधानातील तरतुदींनुसारच निर्णय घेणार. कुणी कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, कोणतेही आरोप केले तरी मी नियमानुसारच काम करणार. अध्यक्षांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण अध्यक्ष तुमच्या गिधड धमक्यांनी घाबरत नाहीत. त्यांच्यावर अशा गोष्टींचा प्रभाव पडत नाही”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

अजित पवार नाराज असल्याने मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर असल्याच्या चर्चा, सुनील तटकरे म्हणाले…

“..ही लोकशाहीची हत्या आहे का?”

राहुल नार्वेकर लोकशाहीची हत्या करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर नार्वेकर म्हणाले, “मी अशा आरोपांवर उत्तर देणं आवश्यक समजत नाही. नियम पाळणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे का? कुणाचीही बाजू न ऐकता मी निर्णय दिला, तर हेच लोक उद्या उठून बोलणार. त्यामुळे अशा लोकांच्या आरोपांवर उत्तर काय द्यायचं? ज्यांना संविधानाचं, नियमाचं ज्ञान नाही अशा लोकांनी केलेल्या टिप्पणीबद्दल बोलण्यात वेळ घालवणं योग्य नाही”, असं ते म्हणाले.

“निर्णय घेण्यात मी दिरंगाईही करणार नाही आणि घाईही करणार नाही. नियमांचं पालन केलंच जाणार. नैसर्गिक न्यायाची संधी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना दिली जाणार. मूळ राजकीय पक्ष कोणता यावरही मला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित सर्व लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासंदर्भात कारवाई केली जाईल”, असंही राहुल नार्वेकरांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly speaker rahul narvekar on mla disqualification hearing delay pmw

First published on: 04-10-2023 at 11:48 IST
Next Story
अकोला : ई-पीक प्रकरणात मुख्यमंत्री, मंत्र्यांना बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या..