महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केलं असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आता मी मुख्यमंत्री आहे, कोणी वाटेला आलं तर…,” एकनाथ शिंदे यांचा जाहीर इशारा

एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे –

एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो असून बाजूला “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन,” असं लिहिण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारलं आणि त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात सत्तांतर झालं असून उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर सतत टीका होत आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा युक्तिवाद करत आहेत.

“बाळासाहेबांनीच अन्यायाला वाचा फोडा सांगितलं होतं”

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. संतोष बांगर समर्थकांसह सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपलं बंड नसून, उठाव आहे असं सांगितलं होतं.

“महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढील निवडणुकीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं असतं. हिंदुत्व, सावरकर असो किंवा दाऊदचा विषय असो…आपल्याला उघडपणे बोलता येत नव्हतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली होती. बाळासाहेबांनी अन्यायाला वाचाव फोडा सांगितलं होतं. त्यामुळे हा बंड नसून अन्यायाविरोधातील उठाव आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde tweet balasaheb thackeray anand dighe hindutva guru purnima sgy