Maharashtra Rain Updates : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या बाजूला रात्रभर पावसाची रिपरिप चालू असून मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा खोळंबली आहे.
IMD Weather Forecast Today LIVE News Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Heavy Rain Updates : हवामान विभागाकडू मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मंगळवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Mumbai Heavy Rain Updates : मुंबईत एकाचा मृत्यू, एक जण बेपत्ता
मलबार हिल येथील नेपियन सी रोड परिसरातील शिमला हाऊस येथे संरक्षक भिंत अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. सतीश तिर्के असे यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, वांद्रे येथील कनकिया पॅलेस इमारतीजवळील बीकेसी पुलावरून मिठी नदीत उतरलेला युवक बेपत्ता आहे. वरदान जंजोतार (२४) असे त्याचे नाव आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. सोमवारी पावसाने आणखी जोर पकडला. सकाळी ११ नंतर मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, शीव, जोगेश्वरी, बोरिवली, मालाड, अंधेरी, सांताक्रुझ, कुलाबा या भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला.