Maharashtra Politics Top 5 Stories : महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते मोर्चेबांधणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (उबाठा) एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान आपण राज्यातील राजकीय क्षेत्रात आज घडलेल्या पाच घडामोडींचा आढावा घेऊया.
‘राज ठाकरे सोडा, आम्ही उद्धव ठाकरेंबरोबरही…’, काँग्रेस नेत्याचे विधीन चर्चेत
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा होत आहे. यातच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील बरोबर घेण्याची इच्छा आहे, असं म्हटलं होतं. “मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही राज ठाकरे तर सोडाच, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही निवडणूक लढवणार नाही. मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हाही मी ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती”, असं विधान काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केलं आहे.
“आता देखील काँग्रेसची जी बैठक झाली त्यामध्ये आमच्या जवळपास सर्वच लोकांनी हेच सांगितलं. आमचे काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला हे देखील होते. आम्ही त्यांना सांगितलं ही एकतर या स्थानिक निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, या निवडणुका नेत्यांच्या नाहीत. कार्यकर्त्यांच्याही इच्छा असतात की आपणही कधी ना कधी निवडणूक लढवल्या पाहिजेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, तर त्यांना या निवडणुका लढू दिल्या पाहिजेत. त्यामुळे आम्हाला शिवसेनेबरोबरही गेलं नाही पाहिजे आणि राज ठाकरेंबरोबर जाण्याचा तर प्रश्नही नाही”, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.
“जनाची नाही पण मनाची तरी…”, शालिनी ठाकरेंची सरकारवर टीका
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे दीपोत्सव केला जातो. या दीपोत्सवात हजारो दिव्यांची आरास केली जाते. या दीपोत्सवाचं क्रेडिट थेट राज्य सरकारनं घेतल्याची बाब समोर आली आहे. दीपोत्सव मनसेकडून आयोजित केला जात असताना त्याची प्रसिद्धी पर्यटन विभागाने केल्याचं समोर आलं आहे. यावर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे. “दुसऱ्यांचे कार्यकर्ते आपल्या कडेवर घ्यायचे आता तर राजसाहेबांचा कार्यक्रम पण स्वतःचा म्हणून मिरवत आहेत. जनाची नाही पण मनाची तरी बाळगावी सरकारने,” असे त्या म्हणाल्या आहेत.
“महेश कोठारेंना सून उर्मिलाला अपघात प्रकरणातून…”; किशोरी पेडणेकरांचा आरोप काय?
भाजपा हे आपलं घर आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य नुकतंच अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंनी केलं. ज्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका होते आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “महेश कोठारे हे कलाकार आहेत, ही खरी गोष्ट आहे. पण त्यांच्या सुनबाई अडकल्यात एका अपघात प्रकरणात. तिला कसं वाचवायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भाजपावर अशी मुक्ताफळं उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही. महाराष्ट्रात जी एक संस्कृती तयार होतोय, मी नाव नाही घेणार, मला कुठल्याही जातीचा अपमान नाही करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं, पण त्यासोबत क्रौर्यही दाखवलं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता महेश कोठारे आणि भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.”
“राणा दाम्पत्य देवेंद्र फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट वाचताहेत….”, बच्चू कडू यांचा प्रत्यारोप
नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर मंगळवारी ‘नौटंकी’ आणि ‘कोट्यवधींची संपत्ती’ जमविल्याचा आरोप केला होता. यावर कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. “सगळ्या पक्षांचे पाठिंबे घेऊन तुम्ही निवडणुका लढता. कधी मशिदीत तर कधी मंदिरात जाता. कधी नमाज पढायचा, तर कधी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करता. पण मी मरेपर्यंत कुणाच्याही ओंजळीने पाणी पिणार नाही. कुण्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही. आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्क्रिप्ट मिळाल्यानंतर तुम्ही दोघे बोलू लागलात,” असा गंभीर आरोपही कडू यांनी यावेळी केला.
महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल – एकनाथ शिंदे
काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी सांगितले की, काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करणार नाही. स्वबळावर लढेल. याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि प्रत्येक पक्ष आपआपला निर्णय घेत असतो. त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल. मी एवढंच सांगेन, लोकसभा आम्ही महायुतीने जिंकलो, विधानसभा महायुती लँडस्लाइड व्हिक्टरी घेऊन जिंकलो. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचा भगवा डौलाने फडकेल.”
“खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय?” धंगेकरांचे मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरणही दिल. यानंतर आता पुन्हा एकदा धंगेकरांनी आरोप केले आहेत. त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचा एक जुन्हा व्हिडीओ शेअर केला आहे.
“कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही ५० टक्के भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बरं खरंच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे. कारण यांचे ५० टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील ३०,००० कोटींच्या फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का? काय वाटतं? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय?”, असे रवींद्र धंगेकर या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.