महाराष्ट्रात करोनाचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसतं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे रूग्णसंख्या. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ८०३ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. मागील २४ तासात राज्यात ८०० हून जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील २४ तासांचा अहवाल काय सांगतो?

मागील २४ तासांमध्ये ६८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण ७९ लाख ९५ हजार २३२ करोना रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा ९८.१३ टक्के इतका आहे. दिवसभरात ८०३ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये तीन करोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८२ टक्के इतका आहे. आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या एकूण ८ कोटी ६६ लाख ७५ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१ लाख ४७ हजार ६७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचं स्क्रिनिंग

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचं स्क्रिनिंग करण्यात येतं आहे अशीही माहिती सरकारने आपल्या अहवालात दिली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी विदेशातून येणाऱ्या नागरिकांचं स्क्रिनिंग करण्यात येतं आहे. २४ डिसेंबर २०२२ पासूनच हे स्क्रिनिंग सुरू करण्यात आलं आहे.

देशातही वाढले करोना रूग्ण

भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात देशात ५,३३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,४७,३९,०५४ वर गेली आहे. गेल्या १९५ दिवसांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५,५८७ इतकी आहे. गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी देशात ५,३८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर कधीही देशात एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले नव्हते. तब्बल सहा महिन्यांनंतर देशात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 803 new covid19 cases and three death reported in the last 24 hours scj