कराड : राज्य सरकारने कराड शहरातील विविध विकासकामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीतून, शहरात नवी उद्याने, क्रीडांगण, सामाजिक सभागृहे, प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण, स्मशानभूमीचा विकास अशा विकासकामांना चालना मिळणार आहे.

आमदार डॉ. भोसले यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीसाठी अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी यापूर्वीही भरघोस निधी आणला असून, त्यात आता आणखी १० कोटींची भर पडली आहे. डॉ. भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ योजनेअंतर्गत नगर विकास विभागाने हा १० कोटींचा निधी दिला आहे.

त्यातून कराड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण व फर्निचरसाठी साडेतीन कोटी रुपये तसेच हिंदू स्मशानभूमी विकसित करण्यासाठी सव्वाकोटी, शनिवार पेठेतील आरक्षित भूखंड क्र. ७२ मध्ये तसेच मंगळवार पेठेतील खुल्या जागेत बगिचा विकसित करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये, बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व व्यापारी संकुल बांधकामासाठी एक कोटी रुपये, नगर भूमापन क्र. ३५ या सार्वजनिक जागेत अभ्यासिका बांधण्यासाठी एक कोटी रुपये, रविवार पेठेतील सर्व्हे नंबर ४३० येथे कुंभार समाजाचे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ५० लाख रुपये, नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्र. १६ मधील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी ५० लाख रुपये आणि नगरपरिषदेच्या मालकीचा आरक्षण क्र. १७ मधील बगिचा विकासासाठी २५ लाख रुपये असा हा १० कोटींचा निधी विकासकामांसाठी खर्च होणार आहे. त्याबद्दल आमदार डॉ. अतुल भोसले यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

मलकापूरमध्ये बायोमायनिंग प्रकल्पासाठी मंजुरी

मलकापूर (ता. कराड) शहरातील वाढत्या घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नगरी) २.० अंतर्गत बायोमायनिंग प्रकल्पासाठी ही मंजुरी मिळाली असून, या निधीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. या प्रकल्पामुळे मलकापूरकरांचा दीर्घकाळाचा कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत राज्यातील एकूण ९० नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये जुन्या साठवलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये मलकापूर नगरपरिषदेचा समावेश व्हावा, यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार या योजनेत मलकापूर नगरपरिषदेचा समावेश झाला असून, त्यासाठी ४१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे कचऱ्याखालील जमिनीचा पुनर्वापर शक्य होणार असून, ही जमीन स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून दिली जाईल. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोके मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.