फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत महाविकास आघाडीमधील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येऊ लागले आहेत. राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मतभेद बाजूला ठेवत एकत्र जरी आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षातील नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसून आले आहे. रायगड जिल्ह्यातही याचीच प्रचिती पहायला मिळाली. श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गिते राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे. यानिमित्ताने रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा जुना वाद, राजकीय वैर पुन्हा एकदा डोकं वर काढू लागल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. ” असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञातवासात गेलेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. श्रीवर्धन इथं त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghad is just compromise for power asj82