सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना फळ-पीक विमा नुकसानीची रक्कम त्वरित मिळावी यासाठी महाविकास आघाडीने गुरुवारी सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ हे धरणे आंदोलन छेडले. वारंवार मागणी करूनही विमा रक्कम न मिळाल्याने, मविआने महायुती सरकार, कृषीमंत्री, पालकमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा तीव्र निषेध करत आपला रोष व्यक्त केला.
मविआच्या नेत्यांनी आरोप केला की, महायुतीचे सरकार, कृषीमंत्री, पालकमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनी एकत्रितपणे आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. एका बाजूला विमा कंपनीला ‘काळ्या यादीत’ टाकण्याची घोषणा केली जात असताना, दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षच या कंपनीला अभय देत आहेत. यामुळेच शेतकऱ्यांचे पैसे थकले असून त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
आंदोलनात प्रमुख नेत्यांची उपस्थिती
माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, शेतकरी व्ही. के. सावंत, शेतकरी विजय प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दिवाळीपूर्वी फळ-पीक विम्याची थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही, तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि जिल्ह्यात यापेक्षाही उग्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात ठाकरे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, राजन नाईक, कन्हैया पारकर, बंडू ठाकूर, नंदू शिंदे, संजय गवस यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.