Ajit Pawar On Manikrao Kokate : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चर्चेत आहेत. वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये आणि विधीमंडळाच्या अधिवेशनावेळी सभागृहात मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळताना दिसल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आपण सोमवारी मुंबईला जाणार असून मंगळवारी माणिकराव कोकाटे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. तसेच चर्चा केल्यानंतर मी मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं मोठं विधान अजित पवार यांनी आज (२५ जुलै) माध्यमांशी बोलताना केलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“विजय घाडगे मला भेटायला आले होते, त्यांनी त्यांची बाजू माझ्याकडे मांडली. ते म्हणाले की आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून काम करतो. आमची एवढीच मागणी होती की आमचं निवेदन स्वीकारावं. कारण मारहाण करण्याची काही गरज नव्हती. तेव्हा मी त्यांना सांगितलं की जे काही घडलं ते चुकीचं आहे. ज्यांच्याकडून ही घटना घडली त्यांना मी पदावरून मुक्त केलं आहे. पोलिसांनी देखील त्यांच्यावर कारवाई केली आहे. विजय घाडगे मला भेटल्यानंतर मी लातूरच्या पोलीस अधीक्षकांना देखील फोन केला होता. त्यांना सांगितलं आहे की ही घटना घडली ती बरोबर नाही. कायदा कोणलाही हातात घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे योग्य ती कारवाई करा”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

‘मी मंगळवारपर्यंत निर्णय घेईल’ : अजित पवार

अजित पवार पुढे म्हणाले की, “मंगळवारपर्यंत त्या संदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. कारण आज मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते उद्या (शनिवारी) येतील, पण मी उद्या पुणे आणि परवा नगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी मुंबईत गेल्यानंतर याबद्दलची बाकीची चर्चा आम्हाला करायची आहे. मंत्री माणिकराव कोकांटे यांच्याबरोबर देखील चर्चा करायची आहे. बाकींच्याही काहींशी चर्चा करायची आहे. या चर्चा करून मी मंगळवारपर्यंत निर्णय घेईल”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्या बैठकीनंतर निर्णय होणार की आधी? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “याबाबत आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते ठरवणार आहोत.”

रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवार काय म्हणाले?

रोहित पवारांनी आरोप केला आहे की मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत. त्यामुळे अनेक मंत्री फोन बंद करून ठेवत आहेत. असा आरोप केला आहे. या आरोपाबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “प्रत्येकाला आरोप करण्याचा अधिकार आहे. तुम्ही पण आता कोणताही आरोप करू शकता. पण आरोप करणाऱ्यांनी काहीतरी पुरावा दिला पाहिजे.”