सोलापूर विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्यांवर आणि मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईवरून सोलापूरकडे येणाऱ्या विमानाच्या लँडिंगदरम्यान पंख्यात मांजा अडकल्याची घटना घडली पण मोठा अनर्थ टळला. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे विमानातील ३४ प्रवाशांचे जीव थोडक्यात बचावले, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी छापेमारी केली

दरम्यान घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी विमानतळ परिसरात मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकत कारवाई सुरू केली आहे. तसेच, पतंग उडवणाऱ्या मुलांवरही महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार खटले दाखल करण्यात आले आहेत. विमानतळ परिसरात अशा प्रकारच्या कृतींवर पूर्णतः निर्बंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर ते गोवा आणि मुंबई अशी विमानसेवा सुरु

सोलापूर शहरातील विमानतळावरून काही दिवसांपूर्वीच सोलापूर ते गोवा आणि सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळाच्या बाजूला असणाऱ्या नई जिंदगी आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्यात येत आहेत. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते म्हणून नई जिंदगी आणि आजूबाजूच्या परिसरात आता पतंग उडवण्यावर कारवाई होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.

पतंगाचा मांजा अडकून दुर्घटना होण्याची शक्यता

सोलापूर विमानतळावर नई जिंदगीकडील बाजूने सर्व विमाने लँड होतात तर श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूने विमान टेकऑफ होतात. अशा भागामध्ये काहीजण पतंग उडवत आहेत त्यामुळे पतंगाचा दोरा विमानाच्या विंगमध्ये अडकून मोठी दुर्घटना होऊ शकते. म्हणून विमानतळ परिसराच्या हद्दीत आता पतंग उडवणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली. पतंग उडवत असताना नायलॉन मांजा आणि चायनीज मांजाचा देखील वापर होत आहे. हा मांजा विक्रीसाठी बंदी असताना सुद्धा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहिता २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या मांजाचा वापर करत पतंग उडवणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.