मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्याच्या राजकारणाचा पारा वाढला आहे. मनोज जरांगेंकडून सरसकट कुणबी आरक्षण किंवा ईडब्ल्यूएसऐवजी स्वतंत्र आरक्षणाची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांकडून मनोज जरांगे राज्यातील वातावरण खराब करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याला आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते सोमवारी (१३ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही वातावरण बिघडवलेलं नाही. आम्ही शांततेत वातावरण करत आहोत. वातावरण बिघडवण्याशी आमचा संबंध नाही. आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवलेली नाही. आम्ही शांततेचं आवाहन करतो आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं शांततापूर्ण आंदोलन आहे. सामान्य ओबीसी काहीही बोलत नाहीत. ओबीसी नेतेच ते हिंसाचार करणार, आत्महत्या झाल्या आणि भेटायला गेले नाही, यांनीच जाळपोळ केली आणि भेटायला गेले, अशी वक्तव्ये करत आहेत.”

“राज्य सरकारकडून महाराष्ट्रभरात दबाव आणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल”

“ओबीसी नेतेच मराठ्यांना विरोध करत आहेत. मंत्री झालेला माणसू सर्वांचा असतो, तो मराठ्यांविरोधात बोलतो. विरोधी पक्षनेता या संवैधानिक पदावर बसलेला माणूसही मराठ्यांविरोधात बोलत आहे. अशी वक्तव्ये करून वातावरण कोण बिघडवत आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे. उलट राज्य सरकारने महाराष्ट्रभरात दबाव आणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले आहेत,” असा मोठा आरोप मनोज जरांगेंनी केला.

हेही वाचा : “गोळीबारानंतर हिरो, आता धमक्या देतात”; वडेट्टीवारांच्या टीकेवर मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका, म्हणाले…

“सरकारला आमचं सांगणं आहे की, तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तरी…”

“ओबीसी नेत्यांनीच दबाव आणला आहे. त्यांचेच लोक हिंगोल, नांदेड, सोलापूरसह इतर जिल्ह्यांत खोटे गुन्हे दाखल करत आहेत. सरकारही जाणूनबूजून असं करत आहे. मात्र, सरकारला आमचं सांगणं आहे की, तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तरी आम्ही आमचा हक्क मिळवणारच आहोत,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.