मराठा आरक्षणाची मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी असल्याची भूमिका घेतली आहे. एवढंच नाही तर आज विधानसभेतही त्यांनी वापरलेल्या भाषेवर चर्चा झाली. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. या सगळ्यात मनोज जरांगे यांना महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार असतील असा दावा भाजपाच्या नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

आशिष देशमुख काय म्हणाले?

“बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचा आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न राहणार असणार आहे. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असेही देशमुख म्हणाले. तसेच राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते”, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहेत, सगळं काही…”, मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा गंभीर आरोप

आणखी काय म्हणाले आशिष देशमुख?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसआयटी स्थापन केली आहे. आता मनोज जरांगेंचा मास्टरमाईंड कोण हे एसआयटीच्या माध्यमातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक आहे. तरीही मनोज जरांगे यांनी जो एककल्लीपणा दाखवला त्यामागे नक्कीच त्यांचा राजकीय हेतू आहे. महाविकास आघाडीतल्या एका पक्षाशी त्यांचं बोलणं झालं आहे. आजच्या वाटाघाटीच्या बैठकीत बीड लोकसभा मतदारसंघ ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचे उमेदवार म्हणून मनोज जरांगे दिसतील. असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.