गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील मागील अकरा दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सरोटी गावात उपोषण करत आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खराब होत असल्याने कुटुबीयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे यांच्या नव्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मराठा समाजात अनेक उपजाती आहेत. कुणी ९६ कुळी तर कुणी ९२ कुळी असल्याचा दावा करतो. त्यामुळे संबंधित लोकांना कुणबी बनवलेलं चालणार आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा- “…तर त्याला खुटी मारलीच समजा”, ‘त्या’ आरोपांवर मनोज जरांगेंचं विधान

“आमचं म्हणणं असं आहे की, ज्यांना ९६ कुळी राहायचं आहे किंवा त्याला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही. अशा लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊ नये. त्यांना जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांनी बिंदास्त मोकळं राहावं. त्यांनी मोठा पाटील किंवा बारीक पाटील, जसं राहायचं तसं राहावं. पण गोरगरीब पोरांचं कल्याण होऊ द्या, त्यांनी कुणबी जात प्रमाणपत्राला विरोध करू नये”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

हेही वाचा- “मी मेलो तरी…”; मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, मित्राने सांगितला भयावह घटनाक्रम

“कारण तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नसेल तर घेऊ नका. तुम्हाला जोरजबरदस्ती केली नाही. तुम्हाला जेव्हा ३०-४० वर्षांनी वाटेल, की आता कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हवं, तेव्हा त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढावं. तोपर्यंत मोठा पाटील म्हणून राहा. वाड्यावर राहा. बंगल्यावर राहा. रानात जाऊन राहा नाहीतर तिकडे डांबरीवर जाऊन झोप…”, अशी रोखठोक भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे. ते ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil on 96 kuli maratha reservation protest in jalna kunabi certificate rmm