Manoj Jarange Patil reaction on assassination conspiracy : मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आली आहे. जरांगे पाटील यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना याबद्दल माहिती दिली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी आपण उद्या सकाळी ११ वाजता याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर आपण मृत्यूला घाबरत नाही असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
हत्येचा कट रचण्यात आल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता जरांगे म्हणाले की, हे सत्य आहे की कट शिजवला गेला. हत्या घडवून आणणं किंवा घातपात करणे या सर्व गोष्टी उघड होतीलच. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालून आहेत. हा कट, षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलं आहे. हे सत्य आहे आणि ते तपासात समोर येईलच. मी उद्या सकाळी अकरा वाजता सविस्तर बोलतो, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी कट रचणाऱ्यांना इशारा देखील दिला. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला आहेस, असे खूप बघीतले. मी करवून घेणाऱ्याला म्हणत आहे. हे चुकीचं पाऊल उचलायला नको होतं. करणाऱ्यापेक्षा करवून घेणाऱ्याला… आम्ही मोजत नाहीत, आम्ही मराठे आहोत हे लक्षात ठेव. मी याच्यावर उद्या बोलणारच आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
मराठा बांधवांना एकच सांगतो, मी यांच्या पाठपुराव्यासाठी खंबीर आहे, तुम्ही फक्त शांत राहा. यांनी रचलेला कट, षडयंत्र जर भेदून आपण माहिती काढू शकतो, तर मग आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत. कारण त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाहीत. होण्याच्या आगोदर जर माहिती होत असेल तर आपण देखील कच्चे नाहीत. आपण देखील लांब हात टाकू शकतो. हे त्या नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मी आज काही बोलणार नाही. फक्त माझ्या मराठा बांधवांनी शांत राहावं. माझ्या समाजाचं माझ्यावर प्रेम आहे. मी समाजासाठी रक्त जाळण्याचीच नाही तर रक्त सांडायची वेळ आली तरी मी सांडायला भीत नाही. त्यामुळे मी मरायला भीत नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले.
जालन्याचे एसपी शेवटपर्यंत जातील, याची आम्हाला खात्री आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमीच कसल्याही कारणात आदेश देतात, कारवाई करतात. यामध्ये आम्ही बघू की फडणवीस खोलापर्यंत जाण्याचे आदेश देतात का, चौकशीला घेण्याचे… किती गांभीर्याने दखल घेतात हेही लक्षात येईल. समाज बघतोच आहे. हे गंभीर आहे हे मात्र खरं आहे. पण हे करणार्यांच्या पाठपुराव्यासाठी आम्ही खंबीर आहेत. पण जो करवून घेत आहे त्याने खूप चुकीच्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.
उद्या सकाळी ११ वाजता मी यावर सविस्तर मांडणी करणार आहे. पुराव्यासहित मांडणार आहे. फडणवीस हे देखील गांभीर्याने दखल घेतील, शेवटचा माणूस, तो नेता याचा आता शेवट करतील याची आम्हाला खात्री आहे. नाही केलं तर पुढे बघू. शिंदे लक्ष ठेवून आहेत. अजित पवारही लक्ष ठेवून असतील. पण माझं मराठा समाजाला सांगणं आहे की तुम्ही थोडं संयमाने घ्या, असे मनोज जरांगे टीव्ही९ मराठीशी बोलताना म्हणाले.
