राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा समाजाने कुणबी जात प्रमाणपत्र आणि आरक्षणाची मागणी लावून धरल्याने ओबीसी समाजाने त्याला कठोर विरोध केला आहे. यामुळे मराठा समाजातील नेते आणि ओबीसी समाजातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात तर शाब्दिक युद्धच सुरू झाले आहे. त्यामुळे समाजातील वातावरण गढूळ होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांचाही उल्लेख न करता सज्जड दम भरला आहे. कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या जातीचाभिमान असतो, तो असलाच पाहिजे. परंतु, पहिल्यांदा आपला देश, आपला भारत, आपला महाराष्ट्र आणि आपलं राज्य असायला पाहिजे. शाळा-हाविद्यालयाचा आपल्याला अभिमान असतो. त्यामुळे जातीचा-धर्माचाही अभिमान असायला हवा. आपल्या जाती-धर्माचा अभिमान जपत असताना सर्वांना विनंती आहे की, इतर समाजाबद्दल, जाती-धर्माबद्दल द्वेष किंवा आकस मनामध्ये ठेवू नका. याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या बोलण्यातून, वर्तवणुकीतून अनवधानानेही असे प्रकार घडत नाहीत ना याची काळजी घ्यावी. एखाद्याच्या समाजाचा मागासलेपणात काळानुरूप बदल झाला असल्यास त्याचं मागासलेपण पुन्हा तपासणं आवश्यक असतं, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “…म्हणून मला टार्गेट करण्यात आलं”, अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “माझ्यावरच्या आरोपांमुळे…!”

मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करायला वेळ लागेल

ते पुढे म्हणाले की, मागासलेपण सिद्ध करण्यासाठी वेळ लागतो. मराठा समाजातील तरुणांनी हे धान्यात ठेवलं पाहिजे. इम्पेरिकल डेटा आणि मागासलेपण सिद्ध होणं फार आवश्यक आहे. इम्पिरिकल डेटा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा केल्याशिवाय तो टिकत नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी येत नाही, तोपर्यंत कोणत्या समाजाला किती आरक्षण द्यावं हे नेमकं समजत नाही. महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं उभं राहण्याचं चित्र दुर्दैवी आहे.

हाच का स्वप्नातला महाराष्ट्र?

“आज अठरापगड जातीत भांडणं होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंचा आणि शाहू महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हाच आहे का असा प्रश्न पडतो”, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

मराठा ही महाराष्ट्राची ओळख

“रविंद्रनाथ टागोर यांनी देशाचं राष्ट्रगीत लिहिताना काय लिहिलंय की, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा… पंजाब होतं, सिंधही तेव्हाच होतं. गुजरातही राज्य आहे आता. पण राष्ट्रगीतात महाराष्ट्र असं म्हटलेलं नाही. हा देश पूर्वीपासून महाराष्ट्राला मराठा म्हणून ओळखतो. मराठा ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची निगडीत अशी ओळख आहे. अटकेपार मराठ्यांनी झेंडे रोवले असं म्हटलं जायचं, तेव्हा सर्व जाती मराठ्यांमध्ये समाविष्ट असायच्या. सेनापती बापट उगाच म्हणाले नाहीत की, ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले. मराठ्याविना राष्ट्रगाडा न चले.’ अवघ्या देशात पहिलं आरक्षण देणारं छत्रपती शाहू महाराज हे आपल्याच कोल्हापुरचे. परंतु, आरक्षणाच्यानिमित्ताने त्यांचे फोटोही लावले जात नाहीत”, असंही पवार म्हणाले.

मराठा ही भावकी होती

“आपली पोरं शिकली पाहिजेत, आयुष्याच्या लढाईत पुढे गेली पाहिजेत असा प्रत्येक आईबाबाचा विचार असतो. पण दुसऱ्याचं पोर शिकतंय याचा द्वेष आपण कधीपासून करायला लागलो आहोत? हा महाराष्ट्राचा विचार नाही. पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावं महाराष्ट्रातील प्रत्येक जातीत सापडतील. मराठा ही भावकी होती. शेती करणारा कुणबी होता. कोणत्याही जातीचा असू द्या, आधीच्या काळात महापुरुषांमध्येही मतभेद होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यातही मतभेद होते. परंतु, टिळकांना न्यायालयात मदत करणारे महात्मा ज्योतिबा फुले याच मातीतले होते, हे विसरून चालणार नाही. यांच्याकडून आपण काही शिकणार आहोत की नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दंगली घडल्या तर जबाबदार कोण?

“महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या. तेव्हाच्या मराठा नेतृत्त्वाने हे लोण वाढू दिलं नाही. दंगली होण्यापासून समाजाला दूर होण्यासाठी प्रयत्न केले. आज महाराष्ट्रात समाजा-समाजात तेढ निर्माण होईल, अशी चिथावणीखोर भाषणं होत आहेत. दुसऱ्या समाजाला उसकवण्याचं काम केलं जातंय, हे थांबलं पाहिजे. यातून दंगली घडल्या तर याला कोण जबाबदार? दंगलीमध्ये गरिबाचं घर जळतं, रक्त सांडतं ते गरिबांचं सांडतं. तरुणांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होतो”, असंही पवार म्हणाले.

“आज महाराष्ट्रात कोणी राजकारणासाठी जाती-जातीत भांडण लावून दंगली घडवून आणत असतील तर मी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हा अजित पवार हे होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी हे होऊ देणार नाही”, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many surnames like pawar jadhav gaikwad ajit pawars indirect warning to bhujbal and jarange over maratha reservation sgk