कराड : जागतिक हृदय दिनानिमित्त सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडतर्फे ‘मेगा वॉकथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि गोल्ड्स जिम यांच्या सहभागामुळे हा उपक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये सर्व वयोगटातील १९०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. जनमानसात हृदय आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचवणे हा या वॉकथॉनचा प्रमुख उद्देश होता.

वॉकथॉनची सुरुवात सह्याद्री हॉस्पिटलपासून झाली. दत्त चौक ते विजय दिवस चौक, कृष्णा नाका आणि परत सह्याद्री हॉस्पिटल या मार्गावरून पुढे जात हा वॉकथॉन विसावला. सहभागी नागरिकांनी हातात आरोग्यविषयक संदेश घेऊन मार्गावर शिस्तबद्धपणे चालत हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि हृदयविकार टाळण्यासाठी आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक दिलीप चव्हाण म्हणाले, ‘हृदयविकार टाळता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताणतणावावर नियंत्रण आणि वेळोवेळी या प्रत्येकाच्या तपासण्या जीवनशैलीचा भाग व्हायला हव्यात.’

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील म्हणाले, ‘हृदयविकार हा भारतातील मृत्युदर वाढवणारा प्रमुख आजार आहे. रक्तदाब, मधुमेह व कोलेस्टेरॉल यांचे नियमित परीक्षण हे हृदयविकार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वॉकथॉनमधून आम्हाला लोकांना सोप्या भाषेत प्रतिबंधात्मक आरोग्य सवयींचा संदेश देता येतो. तसेच वेळेवर निदान आणि योग्य व्यवस्थापन केल्यास अनेक जीव वाचू शकतात.’ डॉ. अमित माने म्हणाले, ‘ग्रामीण आणि उपनगरी भागांपर्यंत हृदय आरोग्य सेवा पोहोचवणे हे सह्याद्री हॉस्पिटल्सचे ध्येय आहे. या वर्षी आम्ही कराड, तसेच चिपळूण येथील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत हृदय तपासण्या आणि हृदयरोग जागरूकता उपक्रम राबवले आहेत.’