जालन्यात एका महिलेने स्वातंत्र्यदिनाच्या भर कार्यक्रमात राज्याचे नवे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना अडवत पोलिसांविरोधात तक्रार केली. अॅड. रिमा खरात काळे असं या महिलेचं नाव आहे. विद्यमान पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात जालन्यात अक्षरशः सुपारी घेऊन घरं खाली करून देण्यात आले आहेत, असा आरोप या महिलेने केला. यावेळी या महिलेसोबत एका दुकानाचे भाडेकरूही होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार महिला रिमा खरात काळेंनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांना सांगितलं, “उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांनी दुकान रिकामं करण्यासाठी या भाडेकरूंच्या घर मालकांकडून सुपारी घेतली. १५ लाखांचं सामान गायब केलं. तसेच भाडेकरूंविरोधातच ३५३ चा गुन्हा दाखल केला.”

महिलेच्या तक्रारीनंतर अब्दुल सत्तार म्हणाले, “आम्ही हे प्रकरण तपासून घेऊ आणि कदाचित यांच्यावर अन्याय झाला असेल तर निश्चितपणे कारवाई करू.”

नेमकं काय घडलं?

अॅड रिमा खरात काळे म्हणाल्या, “आम्ही कृषीमंत्र्यांना अडवलं कारण, जालन्यात काळोख पसरला आहे आणि या काळोखावर मात करण्यासाठी आम्ही त्यांना कंदील देऊन उजेडाची जाणीव करून देणार होतो. मात्र, आमचा कंदील जप्त करण्यात आला. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्याचं प्रतीक असलेला तिरंगा ध्वज भेट देण्यासाठी आणला. आज देशात स्वातंत्र्य असलं तरी आम्ही पारतंत्र्य अनुभवत आहोत.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोनं, हिरे…, जालन्यात मोठी कारवाई, सापडलं तब्बल ३९० कोटींचं घबाड

“इथं अनेक अन्याय अत्याचार होत आहेत. खाकी गुंडागर्दीची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. केवळ लोकांचे टायपिंगचे खर्च होतात. अर्जावर अर्ज दिले जातात. मात्र, अर्जांचा निपटारा होत नाही. खाकी वर्दीसाठी वेगळा कायदा आणि जनसामान्यांसाठी वेगळा कायदा आहे,” असा आरोप रिमा खरात काळे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister abdul sattar first reaction after women stop him in independence day public program jalna rno news pbs