Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासित केले होते. महायुती सरकार स्थापन होऊन आता जवळपास दोन-तीन महिने उलटत आले. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे हप्ते प्रत्येकी १५०० रुपये मिळाले आहेत. मात्र, सरकारने आश्वासित केलेले २१०० रुपये केव्हा मिळणार असा प्रश्न महिलांकडून आता उपस्थित केला जातोय. हाच प्रश्न आज आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. या प्रश्नावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, आता २१०० रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला होता. त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येत्या अर्थसंकल्पात २१०० रुपये घोषित करू असं वक्तव्य केलेलं नाही. राज्य सरकारकडून योजना जाहीर केली जाते. पण (निवडणुकीतील) जाहीरनामा ५ वर्षांचा असतो. त्यामुळे या (आगामी) अर्थसंकल्पापासून २१०० रुपये देणार असं वक्तव्य केलेलं नाही”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

लाभार्थी कमी का होतात?

ज्यावेळेली जुलैमध्ये नोंदणी सुरू झाली, त्यावेळी ५० लाख महिला अशा होत्या ज्यांचं खातं आधार सीडेड नव्हतं. त्यांची सीडिंग प्रक्रियाही सुरू करण्यात आली. आधार सीडेड खातं होत जातात, तसं त्यांच्या खात्यात लाभ वितरित केला जातोय. ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांना आहे. दर महिन्याला ६५ वयोगटातून अनेक महिला बाद होतात, त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या बदलत जाणार आहे. काही महिला विवाह होऊन इतर राज्यात जात असतात, त्यामुळेही लाभार्थ्यांची संख्या बदलत जाते, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

कोणत्या महिन्यात किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला?

ऑगस्टमध्ये पहिल्या हप्त्यात १ कोटी ५९ लाख महिलांना, सप्टेंबर २ कोटी २० लाखपेक्षा जास्त, ऑक्टोबर २ कोटी ३३ लाख, नोव्हेंबर-डिसेंबर २ कोटी ४५ कोटी महिलांना लाभ वितरित केला आहे. कुठेही पात्र अर्जदारांची कमी केलेली नाही. ८ मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्चचा लाभ वितरित करणार आहोत, तेव्हा २ कोटी ५२ लाख महिलांना लाभ पोहोचवणार आहोत. कुठेही लाडक्या बहि‍णींना दुजाभाव केलेला नाही”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी सभागृहाला दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister aditi tatkare on ladki bahin yojana about increasing of fund rupees 2100 sgk