Amazon Prime वर नुकतीच ‘बम्बई मेरी जान’ नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डबाबत ही वेबसीरिज आहे. एकीकडे वेबसीरिजचा विषय चर्चेत असताना दुसरीकडे आता या वेबसीरिजचं नावही चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यासंदर्भात वेबसीरिज पाहून निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं असून त्यात आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे आक्षेप?

‘बम्बई मेरी जान’ वेबसीरिजच्या नावावर अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. एकीकडे भारत की इंडिया, हा वाद चाललेला असताना मुंबईवरून पुन्हा सीरिजला बम्बई हे नाव का देण्यात आलं? असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात अमेय खोपकरांनी ट्विटरवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये इंडिया व भारत या नावांसंदर्भात चालू असणाऱ्या वादाचा संदर्भ त्यांनी दिला आहे.

“मुंबईच्या नावबदलाबाबत लोक उदासीन कसे?”

“नावात काय आहे? असे शेक्सपियर म्हणून गेला. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा’तच सर्व काही आहे असे वाटते! फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या India ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही. पण मग ‘भारत” नाव बदलासाठी आग्रही असणारे लोक ‘मुंबई‘च्या नाव बदला संदर्भात इतके उदासीन कसे?” असा सवाल अमेय खोपकर यांनी या ट्वीटमध्ये उपस्थित केला आहे.

“अहो ‘बॉम्बे’ आणि ‘बम्बई’चे ‘मुंबई’ करण्यासाठी कित्येक लोकांनी किती परिश्रम केले हे आपण विसरलो का? राजकीय दस्तावेजांमधून अधिकृतरित्या जरी जुने नाव हद्दपार झाले असले, तरीही अमराठी आगंतुकांच्या वाणीवरून आणि मनावरून हे नाव पुसून टाकण्याचा लढा आजही चालू आहे”, असं म्हणत अमेय खोपकरांनी ‘बम्बई मेरी जान’ वेबसीरिजच्या बॅनरचा फोटो शेअर केला आहे.

“…अन्यथा खळ्ळखट्याक्”

“अजून मी ही वेब सीरिज पाहिलेली नाही. बघतोच! आणि मुंबई ऐवजी ‘बम्बई‘ वापरण्याची इतकी काय क्रिएटिव्ह गरज होती हेही बघतो. पटलं तर ठीक आहे. अन्यथा खळ्ळ खट्याक्”, असा इशारा अमेय खोपकर यांनी ट्वीटच्या शेवटी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns amey khopkar warns bambai meri jaan web series on amazon prime pmw