मुंबईतल्या मुलुंड भागात तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला मराठी असल्याचं कारण देत घर नाकारण्यात आलं. या प्रकाराचा व्हिडीओ तृप्ती देवरुखकर यांनीच पोस्ट केला होता. जो चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने या इमारतीत जाऊन तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारणाऱ्या सेक्रेटरीला मनसे स्टाईल इंगा दाखवला. त्यानंतर या दोघांनीही माफी मागितली. तसंच राज ठाकरेंनीही यासंदर्भात ट्विट केलं. तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. आता मनसेने एक व्यंगचित्र पोस्ट करत आणि कवी सुरेश भट यांच्या ओळी लिहित सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे मनसेची पोस्ट?

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, अपुल्या घरीच हाल सोसते मराठी.
हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी.

कविश्रेष्ठ सुरेश भट. या दोन ओळी पोस्ट करत मनसेने सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

हे पण वाचा- “पंकजा मुंडेंना ‘मराठी’ म्हणून घर नाकारलं तेव्हा एक आवाज दिला असतात तर..”; मनसेच्या शालिनीताई ठाकरेंचं वक्तव्य

नेमकं हे प्रकरण काय आहे?

तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मुलुंड वेस्टमधल्या ‘शिवसदन’ नावाच्या इमारतीमध्ये घर बघण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, सोसायटीचे गुजराती सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी “महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही घर देत नाही” असं सांगून नकार दिला. यातून वाद वाढला व देवरुखकर यांनी त्या बाचाबाचीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात केली. पण त्यावरूनही या बाप-लेकानं अरेरावी करत त्यांचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी आपल्या पतीलाही मारल्याचा दावा तृप्ती देवरुखकर यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये केला आहे.

हा सगळा प्रकार तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर मनसेनं त्याची दखल घेऊन थेट शिवसदन सोसायटी गाठली. त्यांनी मला त्या सोसायटीत बोलवून घेतलं आणि त्या दोघांनाही जाब विचारला. त्या दोघांनी माफीही मागितली. आपण मनसे पदाधिकाऱ्यांचे आभारी आहोत, असं तृप्ती देवरुखकर यांनी नंतर पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं.

हे पण वाचा- “केम छो वरळी होर्डिंग लावणाऱ्यांमुळेच…”, मुंबईत मराठी महिलेला घर नाकारण्यावरून मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला!

तृप्ती देवरुखकर यांनी व्हायरल व्हिडीओत त्यांनी काय म्हटलं?

“जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकीय वापर करणं बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं सांगितलं. नियमावली मागितली तर धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत हात पकडला आणि माझ्या पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीत परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही तर संताप आहे. आज मला जो अनुभव आला तो किती मराठी माणसांना आला असेल? किती जणांना घरं नाकारली गेली असतील?” असे प्रश्न विचारत तृप्ती देवरुखकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला. जो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी या सोसायटीत पोहचले. त्यांनी इशारा दिल्यानंतर या सोसायटीतल्या लोकांनी माफी मागितली. यानंतर आता मनसेने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं म्हणणं मांडलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns gave warning to the government by post of poet suresh bhat poem about denial house to marathi woman scj