Raj Thackeray In Mira-Bhayandar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे काही कार्यकर्त्यांवर संतापल्याचंही पाहायला मिळालं. सभेत काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात घोडा आणल्यामुळे राज ठाकरे चांगलेच संतपाले. “इथे मी काय बोलतोय ते माणसांना समजत नाहीये, घोड्यांना काय समजणार”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच. मिठाईवाल्याचा काय प्रसंग घडला. विनाकारण काहीतरी कारण असतात. त्या माणसाच्या अरेरावीमुळे कानफटात बसली. बाकी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या कानफटात मारली का? अजून मारली पाहिजे. राजकीय पक्षांचं ऐकून बंद वगैरे केला. मराठी व्यापारी नाहीयेत का? महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवलीत तर दणका बसणार म्हणजे बसणार”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

“दुकानं नाही, शाळाच बंद करेन…”

“हिंदी भाषा पहिलीपासून शिकली पाहिजे म्हणे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की तिसरी भाषा हिंदी करणार म्हणजे करणार. मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागणार होता. तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर करा. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पाहा. दुकानं नाही, शाळाच बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय?”, असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.