चिपळूण – चिपळूण शहरात येणाऱ्या महापुराचा अभ्यास करून त्यावर उपायोजना सूचविण्यासाठी नेमलेल्या मोडक समितीच्या शिफारसी शासनाने अंशतः स्विकारल्या आहेत. 

चिपळूणच्या महापुरावर उपायोजना करण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने १७ शिफारसी केल्या होत्या.  यातील बहुतांश व काही अंशत: शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत. वाशिष्ठी नदी इशारा पातळी किंवा त्यावरून वाहत असेल तसेच त्याचवेळी पावसाचे प्रमाण १५० ते २०० मीमी. असेल तर किमान ओहोटीच्या काळात पूर विसर्गाचे परिचलन केल्यास काही अंशी चिपळूण रहिवाश्यांना दिलासा मिळू शकेल.

तसेच अशा पूर कालावधीत कोयना टप्पा-१/२ व ४ ची वीज निर्मिती बंद ठेवून कोयना धरणातील पाणी कोळकेवाडी धरणात घेवू नये. कोळकेवाडी धरणाच्या जलाशयाची पाणी पातळी समतोल ठेवण्यासाठी भरतीच्या कालावधीत शक्यतो १ किंवा २ जनित्रांद्वारेच वीज निर्मिती करुन विसर्ग २९०० ते ५४०० क्युसेक्सच्या मर्यादेत ठेवणे योग्य राहील. आपत्तीच्या काळात कोळकेवाडी धरणाच्या पाणलोटातून येणारे पाणी धरणाच्या सांडव्यावरून सोडण्याची वेळ येऊ शकते त्यासाठी सांडण्याची दुरुस्त करून ते सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे.

तसेच सांडव्याच्या दारांमागे स्टॉपलॉग गेटची तरतूद करणे आवश्यक आहे. तिसऱ्या टप्प्याची तीन ते चार जनित्रे चालवून ८७०० ते ११६०० क्युसेक्स विसर्ग सोडला तरीसुद्धा कोळकेवाडी धरणामागच्या पाणलोटातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करता येतो. नदीतील अतिक्रमण हटवून बोलादवादी नाल्याचा मार्ग १२००० क्युसेक्स सुरक्षितपणे वाहू शकेल अशा स्थितीत ठेवावा. पूर परिस्थितीच्या काळात कोळकेवाडी जलाशयाकडे वाशिष्ठी डायव्हर्शन विअर मधून वळवण्यात आलेले पाणी बंद करावे. हे पाणी थेट वैतरणी नदीत सोडले जावे.

वाशिष्ठी, वैतरणासह उपनद्यातील गाळ काढून नदी पूर्वप्रवाहित करणे, मातीची धूप थांबवणे, मृद आणि जल संधारणाच्या उपाययोजना करणे. वृक्षतोडीवर कायमस्वरूपी बंदी आणने,  हानी पोहोचलेल्या भागात पुनर्लागवड करणे गरजेचे आहे. दरडी आणि डोंगर कोसळण्याच्या घटना थांबवण्यासाठी जैविक उपाययोजना कराव्यात. अशा शिफारसी करण्यात आल्या आहेत.

कोळकेवाडी धरणाच्या पाण्यामुळे महापूर येत नाही. हे मी पुराव्याने सिद्ध केले आहे. जुलै २०२१ नंतर मोठा पूर आलेला नाही. सध्या पावसाचा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडतो. त्यामुळे ३०० मि.मी पैक्षा जास्त पाऊस झाला तर काळजी घेण्याची गरज आहे. – दीपक मोडक, अध्यक्ष, अभ्यास समिती

मोडक समितीच्या सर्व मागण्या शासनाने आणि आम्ही स्विकारलेल्या नाहीत. ज्या मागण्या शासनाने स्विकारल्या त्याबाबत आम्ही समाधानी आहोत. उर्वरित मागण्यांसाठी आमचा शासनाकडे लढा सुरू राहील. कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन झाल्यामुळे शहरात पाणी भरण्याचे प्रमाण कमी झाले हे मान्य करावेच लागेल. – राजेश वाजे, अध्यक्ष चिपळूण बचाव समिती 

  • जुलै २१ ला चिपळूणात महापूर.
  • डिसेंबर २०२१ ला मंत्रालयात चिपळूणच्या महापुरावर चर्चेसाठी पहिली बैठक.
  • मे २०२२ ला अभ्यास गटाची स्थापना.
  • ऑगस्ट २०२२ ला अभ्यास गटाचा चिपळूण दौरा.
  • ऑक्टोबर २२ मध्ये समितीचा अहवाल शासनाला सादर.
  • ऑक्टोबर २५ ला शासनाने समितीचा अहवाल अंशतः स्विकारला.