मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. शिंदे काल (९ एप्रिल) रात्री लखनौ विमानतळावर दाखल झाले. शिंदे रविवारी अयोध्येला जाऊन रविवारी दुपारी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन संध्याकाळी शरयू नदीच्या किनारी महाआरती करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रविवारी रात्री सदिच्छा भेट घेऊन चर्चाही करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दिल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत.

दरम्यान, या अयोध्या दौऱ्यावरून विरोधी पक्ष टीका करत आहेत. तर भाजपा आणि शिंदे गटाचे नेते या दौऱ्याचं समर्थन करत आहेत. भाजपा नेते मोहित कंबोज या दौऱ्याबाबत आशावादी आहेत. ते म्हणाले की, आयोध्येमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन ऊर्जा घेऊन महाराष्ट्रात येतील आणि वेगाने कामं करतील. रामलल्लाचे दर्शन घेऊन आम्ही जेव्हा मुंबईत येऊ तेव्हा याच ऊर्जेने महाराष्ट्रातील विकासकामांना वेगाने पुढे घेऊन जाऊ. मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाला आणि राज्याला पुढे घेऊन जात आहेत. ते लोकांची कामं करतील, राज्याचा विकास करतील.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे (शिंदे गट) बंडखोर आमदार तसेच भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते सोबत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार संजय कुटे आदी नेतेही सहभागी झाले आहेत. शिंदे यांचं काल लखनौ विमानतळावर ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं. भाजपचे उत्तर प्रदेशमधील पदाधिकारी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.