महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध केल्यानंतर या विषयावरुन राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. भाजपानेही हे भोंगे हटवण्याची मागणी यापूर्वीच केली होती. राज यांनी तर राज्य सरकारला थेट ३ मेपर्यंतचा अल्टीमेटम दिलेला असून त्यानंतर भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावू असा इशारा दिलाय. यावरुन आता महाविकास आघाडी विरुद्ध मनसे आणि भाजपा असा वाद सुरु झालाय. असं असतानाच आता आमदार नवनीत राणा यांनी या भोंगा वादामध्ये उडी घेत हनुमान जयंतीनिमित्त मंदिरावर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज देशभरामध्ये हनुमान जयंती साजरी केली जात आहे. याचनिमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपण आज हनुमान मंदिरावर भोंगा लावून हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचं सांगितलं. मी आणि आमदार रवी राणा दोघेही हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालीसाचं पठण करणार आहोत. आम्ही हे आजच करत नसून मागील अनेक वर्षांपासून करतोय, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं. रवीनगरमधील हनुमान मंदिरावर भोंगा लावून हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्यात.

काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा हे रवीनगरमधील एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या हजारो महिलांसोबत बसून हनुमान चालीसा पठण केलं होतं. दोन तास त्यांनी हनुमान चालीसा पठण केल्याने या कार्यक्रमाची अमरावतीमध्ये चांगलीच चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp navneet rana to recite hanuman chalisa on loudspeakers on occasion of hanuman jayanti scsg