अहिल्यानगर : जिल्ह्यातील ११ नगर परिषद व ४ नगरपंचायती अशा एकूण १५ पालिकांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज, सोमवारी मंत्रालय पातळीवर झालेल्या सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. देवळाली प्रवरा, श्रीगोंदे व श्रीरामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

सोडतीद्वारे आरक्षित झालेले नगराध्यक्ष पद पुढीलप्रमाणे : शिर्डी- अनुसूचित जाती महिला. राहुरी- अनुसूचित जमाती. कोपरगाव, पाथर्डी व राहाता- नागरिकांचा प्रवर्ग. जामखेड, संगमनेर व शेवगाव- खुल्या प्रवर्गातील महिला. नेवासा, देवळाली प्रवरा, श्रीगोंदे व श्रीरामपूर- खुला प्रवर्ग. पारनेर व अकोले- नागरिकांचा मागास प्रवर्ग. कर्जत- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

जिल्ह्यात सध्या कर्जत, पारनेर व अकोले अशा केवळ तीनच पालिका अस्तित्वात आहेत. इतर पालिकांची मुदत संपवून दोन ते पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या निवडणुका रखडलेल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद जनतेमधून निवडणूक होऊन नियुक्त होणार आहे.

नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्याने आता सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये धावपळ उडणार आहे. या पालिकांची प्रभागरचना यापूर्वीच अंतिम झालेली आहे. त्यांची मतदारयादी तयार करण्यासाठी मतदारनोंदणीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आलेला आहे. पारनेर, अकोले व कर्जत या तीन नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नसली, तरी तेथे आगामी कार्यकाळातील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले आहे.

खुला प्रवर्ग, खुल्या प्रवर्गातील महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला अशा जागांसाठी रस्सीखेच निर्माण होणार आहे.

कर्जत-जामखेड-श्रीगोंद्यात रंगत येणार

कर्जत : जामखेडचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला व कर्जतचे नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

या निवडणुकांमध्ये जनतेतून नगराध्यक्षांची निवड होणार असल्याने या दोन्ही नेत्यांसमोर आपापला जनाधार टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कर्जत नगरपंचायतीची मुदत संपण्यासाठी काही महिन्यांचा अवधी आहे. ओबीसी महिला आरक्षणामुळे येथील राजकीय समीकरणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. जामखेडचे पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले. दोन्ही ठिकाणी महिला नेतृत्वाचा उदय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल.

राजकीयदृष्ट्या वजनदार श्रीगोंद्याचे आरक्षण सर्वसाधारण आहे. त्यामुळे तेथेही महायुतीमधीलच आमदार विक्रमसिंह पाचपुते, राजेंद्र नागवडे आणि माजी आमदार राहुल जगताप या तीन गटांत तीव्र राजकीय चुरस अपेक्षित आहे. कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या तिन्ही ठिकाणच्या आरक्षणामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुका रंगतदार ठरतील.