सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीस काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनीही हजेरी लावल्याने ते पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता अद्याप आपण कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस आ. इद्रिस नायकवडी, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, कार्याध्यक्ष जमिल बागवान, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील ध्येयधोरणाबाबत चर्चा करण्यात आली. पक्ष कार्यकर्त्यांचा जुलै महिन्यात मेळावा सांगलीत आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यास उपमुख्यमंत्री पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या बैठकीस काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वनखंडे उपस्थित होते. यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे मानले जात आहे. मिरजेचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले होते. दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाल्यानंतर त्यांनी भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे गेले काही दिवस त्यांनी राजकीय क्षेत्रापासून अलिप्ततेचे धोरण स्वीकारले होते.

दरम्यान, प्रा. वनखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्याचे मान्य केले. मात्र, याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली असल्याचे सांगितले. येत्या आठ दिवसांत कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.