पक्ष कुठलाही असो, निवडणूक कुठलीही असो, प्रस्थापितांच्या भोवतीच नगरचे राजकारण फिरत राहते. पण राज्यातील सत्तांतरानंतरही त्यांच्यात निकाल निश्चिती, कुरघोडीचा खेळ सुरूच राहिला. त्यात पारंपरिक मतपेढी फुटली. नव्याने तयार झालेल्या मध्यमवर्गीय व तरुण वर्गात प्रस्थापितांबद्दल अजिबात आकर्षण नसल्याने त्याचा प्रस्थापितांना धक्का बसला. त्यातून काँगेस, राष्ट्रवादीत असलेले व भाजपच्या आश्रयाला गेलेले नेतेही सुटलेले नाहीत.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, माजी आमदार अशोक काळे, जयंत ससाणे, भानुदास मुरकुटे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे आदी विविध पक्षांत असलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या मतदारसंघातील पालिका निवडणुकांमध्ये प्रथमच धक्कादायक निकाल लागले. पक्ष कुठलाही असो त्यांचे सोयीचे राजकारण सुरूच असते. राजकीय मक्तेदारी कायमची ठरलेली असते. पण प्रथमच त्यांना देशात व राज्यात बदलेल्या राजकीय वातावरणाचे झटके बसू लागले आहे.
गड सांभाळताना त्यांची दमछाक होत आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रथमच त्यांची पालिका निवडणुकीत कोंडी झाली. यंत्रणा व आर्थिक क्षमतेच्या जोरावर निवडणुका जिंकता येत होत्या. पण मिनी विधानसभेमुळे प्रतिमा महत्त्वाची ठरली. त्यातच झोपडपट्टीतील दलित, इतर मागासवर्गीय तसेच मुस्लीम या मतदारांची मतपेढी सुरक्षित राहिली नाही. पूर्वी काँग्रेसचा पंजा व राष्ट्रवादीच्या घडय़ाळाला ती आपोआप मिळे. आता ती गणिते बिघडली. ही मतपेढी फुटली. तरुण मतदारांमध्ये प्रस्थापितांचे आकर्षण संपले. नव्याने तयार झालेला मध्यमवर्ग हा स्थानिक सत्तेविरुद्ध बंड पुकारू लागला. त्यामुळे प्रथमच निवडणूक आली की, धर्म व जातींच्या कुंडल्या मांडून मतांचे गणित सोडविणारांचे आता फासे उलटे पडू लागले. मतपेढीकरिता छुपा जातीयवादाची पेरणी महागात पडली.
निवडणुकीच्या तोंडावर जातीचे मोच्रे निघाले. त्याचा मतदानावर फारसा प्रभाव दिसला नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तरुण मतदारांवरील गारूड कमी झालेले नसल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. मोठय़ा शहरात निश्चलनीकरणाचा फायदा हा भाजपला झाला. लोकसभा व विधानसभेतील तयार झालेली राजकीय हवा अजूनही कमी झाली नसल्याने त्याचा फायदा भाजपला झाला. या प्रस्थापितविरोधी वातावरणाचा फायदा शिवसेनेला घेता आला नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे हे खासदार म्हणून निवडून आले. पण शिवसेनेला या निवडणुकीत फार काही फायदा झाला नाही. १८१ जागांपकी केवळ १२ जागा त्यांना मिळाल्या. अनेक ठिकाणी त्यांचे अस्तित्व पुसले गेले. भाजपला ५६, काँग्रेस ६४, राष्ट्रवादी १६ तर स्थानिक जनविकास आघाडीला १६ जागा मिळाल्या. अपक्षांची फारशी डाळ शिजली नाही. काँगेस व राष्ट्रवादीच्या जागा पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्या. याचा फायदा भाजपला झाला.
राष्ट्रवादीला धक्का
राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी झाली. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पाथर्डीत स्वत:च पक्षाचे घडय़ाळ चिन्ह घेतले नाही. सेनेत असलेले माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्याशी राष्ट्रवादीचा दोस्ताना होत आहे. पण त्यांनी आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढविली. कोपरगावला सेनेतून राष्ट्रवादीत घेतलेले अशोक काळे यांची किमया कामाला आली नाही. देवळालीप्रवरा, संगमनेर, राहाता, शिर्डी येथेही त्यांची फारशी डाळ शिजली नाही. माजी मंत्री गोिवदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. तरुण आणि नववर्गाच्या प्रतिनिधी याचा त्यांना फायदा झाला. मुरकुटे आणि आदिक यांच्यामुळे राष्ट्रवादीला एवढाच काय तो दिलासा मिळाला.
भारतीय जनता पक्षाला मात्र मोठा लाभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम िशदे, मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रचार केला. देवळालीप्रवरा येथे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची सत्ता आली. राहात्यात डॉ. राजेंद्र पिपाडा तर पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांना भाजपचा लाभ झाला. मात्र आमदार शिवाजी कर्डिले यांनी काँग्रेसबरोबर युती करून राहुरीत तनपुरेंना शह देण्याचा केलेला प्रयत्न फसला.
कोपरगावात आमदार स्नेहलता कोल्हे भाजपत तर काळे राष्ट्रवादीत आहे. काळे-कोल्हेंना लोकांनी धक्का दिला. भाजपचे बंडखोर विजय वहाडणे हे यंत्रणा, पसा, सत्ता नसतानाही आठ हजारांच्या फरकाने निवडून आले. लोकांनीच ती निवडणूक ताब्यात घेतली. स्वच्छ प्रतिमा, संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांला जनशक्तीने नगराध्यक्ष केले. सर्वच पालिकांत प्रस्थापितांना हादरे बसले. त्यातून भाजपच्या आश्रयाला गेलेले नेतेही सुटू शकले नाही.
घराणेशाहीला मतदारांचा थारा
देवळालीप्रवरा येथे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव सत्यजीत, राहुरीत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त, राहात्यात डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या पत्नी ममता, माजी मंत्री कै. गोिवदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार कै. सूर्यभान वहाडणे यांचे चिरंजीव विजय, थोरात यांच्या भगिनी व आमदार तांबे यांच्या पत्नी दुर्गा या नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्या. मतदारांनी घराणेशाहीला थारा दिला.
