धवल कुलकर्णी
सर्वसामान्यांसाठी सरकारदरबारी भोगावी लागणारी दप्तरदिरंगाई ही काही तशी नवीन नाही. पण असाच अनुभव राज्यातला सर्वोत्कृष्ट सभागृह असलेल्या संस्थेच्या सदस्यांना आला तर? तसंच काहीसं आज महाराष्ट्राच्या विधानसभेत झालं.
मागील अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या औचित्याच्या मुद्द्यांना राज्याच्या प्रशासनाकडून वेळेवर उत्तर मिळत नसल्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रुद्रावतार धारण करून राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी सभागृहासमोर येऊन माफी मागावी, असे आदेश काढले. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यावर अध्यक्षांनी आपली भूमिका सौम्य केली.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर शून्य प्रहरात पटोले यांनी मागच्या अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या ८३ औचित्याच्या मुद्द्यांपैकी प्रशासनाकडून फक्त चारचेच उत्तर आल्याचे सांगितले. संतापलेल्या अध्यक्षांनी राज्य प्रशासनाच्या या दफ्तरदिरंगाई आणि धिम्या कारभाराबद्दल मुख्य सचिव मेहता यांना जबाबदार धरून त्यांनी सभागृहाची माफी मागावी, असा आदेश काढला. अध्यक्षांनी अशी भूमिका घेतल्यावर सर्वजण अवाक् झाले.
मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित याची दखल घेत घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आणि यापुढे असे होणार नाही याची खात्री दिली. पवारांनी अध्यक्षांना अशी विनंती केली की त्यांनी या आदेशाचा पुनर्विचार करावा. राज्य सरकार घडलेल्या प्रकाराची त्वरित दखल घेऊन यासंदर्भात बैठकीचे आयोजन करेल, असे त्यांनी सांगितले. आपण सभागृहातल्या सर्वोच्च पदावर आहेत, मात्र इतकी कठोर भूमिका यापूर्वी कधी घेण्यात आली नव्हती, असे त्यांनी नमूद केले.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सुद्धा स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी शासनातर्फे माफी मागितली असल्याने आपण त्यांना बोलावून समज द्या आणि यापुढे असा प्रकार झाला तर त्यांना प्रस्तावित केलेली शिक्षा भोगावी लागेल असे सांगा, असे म्हटले. महसूलमंत्री थोरात यांनी सुद्धा घडलेल्या प्रकाराची दखल घेतली.
त्यानंतर पटोले यांनी आपली भूमिका सौम केली. मात्र सभागृहाचे पावित्र्य राखले जात नसेल तर काडक भूमिका घेणं भाग आहे. ठाणेदार सुद्धा आमदारांचा मान ठेवत नाहीत. यापुढे प्रशासनाने अशी वागणूक दिल्याच्या तक्रारी आमदारांकडून आल्यास मुख्य सचिवांना मी जबाबदार धरेन, अशी तंबीही त्यांनी दिली. मी जोपर्यंत या खुर्चीवर आहे तोपर्यंत सदस्यांचा अपमान सहन करणार नाही, असा दमही त्यांनी भरला.