नांदेड : शहराच्या वेगवेगळ्या भागांत गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरू असताना रविवारी सकाळी ११ वाजता वसरणी परिसरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. शेख परवेज (वय २५) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
नांदेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्याची मालिका सुरू आहे. नांदेड पोलिसांनी वेगवेगळ्या आरोपींकडून रिव्हाॅल्व्हर सारखे शस्त्र जप्त केले असले तरीही त्याचा अनेकांकडून वापर अजूनही सुरूच आहे. रविवारी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अशू पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे व शेख परवेज, तेजासिंग बावरी या तिघांमध्ये वाद सुरू होता. प्रारंभी शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रकरण टोकाला गेल्यानंतर कमलेश लिंबापुरे याने शेख परवेज व तेजासिंघ बावरी याच्यावर गोळी झाडली. यात शेख परवेज हा जागीच ठार झाला तर तेजासिंघ बावरी गंभीर जखमी झाला. त्याला नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, सिडकोचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी धावले. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. सिडको पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी काही पथके तैनात करण्यात आली आहेत. नांदेड जिल्ह्यात गावठी पिस्टल, रिव्हाॅल्व्हर यांसारख्या शस्त्रांचा सर्रास वापर होते. पोलिसांकडून शस्त्र वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई होते. पण ही शस्त्र कुठून येतात याबाबत पोलीस मात्र अनभिज्ञ आहेत.