कराड : पुणे- बंगळूरू महामार्गावरील पाचवड फाट्यालगतच्या नारायणवाडी (ता. कराड) परिसरात महामार्गाच्या कामामुळे ९० हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन, शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पुणे- बंगळूरू महामार्गावरील पाचवड फाट्यालगतच्या नारायणवाडी (ता. कराड) परिसरात महामार्गाच्या कामामुळे ९० हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या ठिकाणी गटरची उंची रस्त्यापेक्षा जास्त असल्याने पाणी साचून राहत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नव्हती. यावर संबंधित शेतकऱ्यांनी येत्या गुरुवारी (दि. १४) आंदोलन छेडण्याचा आणि आत्मदहन करण्याचा इशारा देत कराडचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले होते.

याची माहिती मिळताच आमदार डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने नारायणवाडीत जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, गटरची उंची रस्त्यापेक्षा अधिक असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे स्पष्ट झाले. यावर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी डॉ. भोसले यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी व स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक कामासाठी केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचबरोबर प्रस्ताव मंजूर होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना म्हणून लगेचच आवश्यक यंत्रे (मशिनरी) उपलब्ध करून देण्याचे आदेशही महामार्ग प्राधिकरणाला दिले.

दरम्यान, अतिक्रमण किंवा स्थानिक समन्वयाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी केल्या. नारायणवाडीतील ग्रामस्थांना कसल्याही परिस्थितीत अडचण येऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी शेतकरी जालिंदर यादव म्हणाले, की आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आम्हा शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी थेट आमच्या बांधावर येऊन पाहणी केली. आमचे म्हणणे ऐकून घेऊन उपाययोजना करण्याबाबत तातडीने प्रशासनाला उचित सूचना दिल्या. त्यांच्यामुळे आमचा प्रश्न येत्या सहा महिन्यांत निकाली लागेल, याची खात्री वाटते.

या प्रसंगी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, माजी सरपंच राजेंद्र देशमुख, नथू पाटील, कृष्णात यादव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.