Navneet Rana : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील टवाळखोर एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे. आता छेडछाड प्रकरणावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय प्रकरण आहे?

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. यानंतर टवाळखोर तरुणांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्या. आता माजी खासदार नवनीत राणा यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नवनीत राणा यांनी काय म्हटलं आहे?

“तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या. पण असे प्रकार करू नका, हात जोडून विनंती करते. राजकारण गेलं खड्ड्यात, जर कोणी राजकीय व्यक्ती असं करत असेल तर भरचौकात आणून त्यांना फाशी द्यावी. जर राजकीय व्यक्ती असे करत असतील तर हे खूप निंदनीय गोष्ट आहे. आमचे गृहमंत्री कडक कारवाई करणार आहेत. मुलगी कोणाचीही असो. ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहणार”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित करुन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणातील संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तसंच एकाला अटकही करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana angry reaction on minister raksha khadse daughter molestation case in muktai nagar what did she say scj