चिपळूण : नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठेत उलाढालीला वेग आला आहे. नारळ, खण, फुले, पूजा साहित्यांना मोठी मागणी आहे. हॉटेल व्यवसाय तेजीत आला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांतही नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे.
या उत्सवामुळे मंदिर असलेल्या गावातील बाजारपेठा गजबजल्या आहेत. काही गावांमध्ये मंदिराच्या देवस्थान ट्रस्टने नारळ, खण, फुले, पूजा साहित्य विक्रीची व्यवस्था केली आहे. तर काही ठिकाणी खासगी स्टॉल लागले आहेत. तुरंबव येथील शारदा देवीच्या मंदिर परिसरात तब्बल नऊ दिवस यात्रा भरते. या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होते. चिपळूण व परिसरातील देवींच्या दर्शनासाठी रिक्षांची मागणी वाढली असून, अनेक रिक्षा आगाऊ आरक्षित केल्या गेल्या आहेत.
यामुळे रिक्षा व्यवसायातही चैतन्य आले आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला खाजगी वाहतूक करणाऱ्या चाकी गाड्यांची संघटीत बुकिंग करून मंदिरांना भेटी देत आहेत. त्यामुळे अशा वाहतूकदारांचा धंदा तेजीत आला आहे. खण-नारळ, फुले, मिठाई, पूजा साहित्य, कपडे, सजावट साहित्य या वस्तूंना प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. काही ठिकाणी मंदिरांच्या बाहेर या वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल लागले आहेत. परिणामी लहान-मोठ्या व्यावसायिकांची वर्षभराची बेगमी या दिवसांत होत असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
सुहासिनींकडून देवीला खण-नारळाची ओटी अर्पण करण्यासाठी मोठी लगबग दिसून येते. नारळाचे भाव २० रुपयांच्या पुढे गेले आहेत, तर खण पाच ते १० रुपयांना मिळत आहेत. प्रसादासाठी काकडीचे तुकडे वाटण्याची प्रथा असल्याने काकडीचा भाव ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. झेंडूची फुले, हार, पेढे, खोबरे, उदबत्ती, कापूर यांनादेखील चांगली मागणी आहे. फक्त दुकानदारच नव्हे तर पूजाविधी करणारे पुरोहित, भजन-कीर्तनकार, वादक, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे कलाकार, व्याख्याते, गरबा-दांडिया आयोजित करणारी मंडळे यांनाही यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. महिलांच्या नवरंग पोशाखामुळे ब्युटी पार्लर व्यवसाय तेजीत आहे. तरुणाईसाठी फॅन्सी ड्रेस, दांडिया, पारंपरिक पोशाखांच्या दुकानांतही गर्दी आहे.
चौकाचौकांत दररोज रात्री गरबा-दांडियाचे कार्यक्रम रंगत असून, प्रायोजकांकडून खेळाडूंना स्नॅक्स व थंडपेय पुरवले जात आहेत. परिणामी हॉटेल व फास्टफूड व्यवसायातही उलाढाल वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदवार व राजकीय पदाधिकारी विविध गरबा मंडळांमध्ये हजेरी लावत असून, त्यातूनही मंडळांना उत्पन्न मिळत आहे.
या व्यवसायांची चलती
नारळ, खण, झेंडूची फुले, पेढे, खोबरे, काकडी, फळे
मंडप, ध्वनीक्षेपक, सजावट, विद्युत रोषणाई
साडीचोळी, रांगोळी, उदबत्ती, मूर्तिकार
रिक्षा वाहतूक, भजन-कीर्तनकार, विविध कलाकार
ब्युटी पार्लर, फॅन्सी ड्रेस साहित्य भाड्याने देणारे
दांडिया विक्रेते, हॉटेल व स्नॅक्स व्यवसाय
विंध्यवासनी देवीच्या दर्शनासाठी राज्यातील भक्त येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि नवस फेडण्यासाठी येणाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून सर्व प्रकारचे साहित्य आम्ही मंदिर परिसरात उपलब्ध करून देतो. यातून काहीना रोजगारही उपलब्ध होत आहे. – शशी कुलकर्णी, विंध्यवासिनी परिसरातील विक्रेते