राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. संतापामध्ये मी कधीही फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग असं म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी तसे मी कधी बोलणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी केलं असून पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थानं, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात तर मुसलमान आला तरी चालेल पण अनिल गोटे येता कामा नये यासाठी पैशाचा महापूर आला होता. पण संतापामध्ये मी कधीही फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग असं म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी तसे मी कधी बोलणार नाही”.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. “कुत्सीत विचारांच्या, हलकट मनोवृत्तीचे, लबाडी व खोटे बोलण्याचे एकत्रित रुप म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. ते हलक्या कानाचे कारस्थानी आहेत की, शकुनी मामा देखील झक मारेल. प्रारंभीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कारस्थान यांनीच रचले. खडसे दाऊदच्या बायकोसोबत फोनवर बोलतात इथपासून सुरु झालेले आरोप त्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले. नाथाभाऊंची चूक एवढीच की त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती,” असंही ते म्हणाले आहेत.

पडळककरांच्या टीकेवर बोलताना अनिल गोटे यांनी म्हटलं आहे की, “पडळकरांचा राजकारणातील अनुभव फारच तोकडा आहे. पडळकरांनी शरद पवारांना करोनाची उपमा दिली यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाच क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकिर्दीसमोर पडळकर डासाएवढेही नाहीत. डास मारायला कोणी बंदूक वापरणार नाही. एक हीटचा फवारा भरपूर असतो”.

पडळकरांना भाजपाच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हाच शुद्धीवर येतील असंही ते म्हणाले आहेत. “पडळकर नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहे. नवरी रुळल्यावर त्यांना झटके बसतील त्यावेळेला बाजूला स्वत:ची सावलीसुद्धा उभी राहणार नाही. माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो आहे,” असं ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp anil gote controversial statement on bjp devendra fadanvis sgy