अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी पावसाचेही आगमन झाले. भर पावसात अजित पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेवर बरसताना दिसले. “निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचा मी हेडमास्तर आहे. यंदा तुझा कंड जिरवतो. तू खासदार कसा होतो, ते बघतोच”, अशा शब्दात अजित पवार यांनी निलेश लंके यांचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

लंके नंतर दिवे लावेल, हे माहीत नव्हतं

अजित पवार यांनी निलेश लंकेंना आमदारकीची उमेदवारी कशी दिली, याबद्दलचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “पारनेरसाठी उमेदवार शोधत असताना माझ्या जवळच्या लोकांनीच मला निलेश लंकेची भेट घालून दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेखातर मी निलेश लंकेला उमेदवारी दिली. पण मला वाटलं नव्हतं हा बाबा नंतर दिवे लावेल. गडी दिसायला बारीक, पण लई पोहोचलेला आहे. त्याला विकासकामांसाठी खूप निधी दिला. मला वाटायचं गरीब घरातला आहे. चांगलं काम करतोय. पण नंतर मला त्याची लक्षणं कळायला लागली.”

‘मी शरद पवारांचा मुलगा असतो तर?’, जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले, “सरंजामशाही…”

तू ज्या शाळेत शिकतो तिथला मी हेडमास्तर

निलेश लंके यांच्याबद्दल बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, “अधिकाऱ्यांनाही खुलेआम धमक्या देण्याचा प्रकार निलेश लंकेने केला. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे लंके धमक्या देत होते. मी उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना अतिशय नम्रतेने बोलतो. त्यांना आदर देतो. पण हा पठ्ठ्या तर “ऐ कलेक्टर इकडं ये” असं बोलायचा. पोलिसांशी बोलताना “मी तुमचा बाप बोलतोय” अशा धमकीच्या स्वरात बोलायचा.”

निलेश लंकेंना इशारा देताना अजित पवार म्हणाले की, अरे निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार आहे. तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझा कंड असा जिरवीन की तुला सतत अजित पवारच दिसेल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मिश्किल वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा; वाचा नेमकं काय घडलं

निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा

“तू माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्यांचा पुरता बंदोबस्त केला आहे. तू तर किस झाड की पत्ती आहे. तू फार शहाणपणा करू नको. मी जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत राहतो. जर तू आमच्या माणसाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर तुला बघून घेईन. या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा”, असे आवाहनच अजित पवार यांनी मतदारांना केले.