NCP MLA Nitin Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार नितीन पवार यांची शासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी मतदारसंघातील आश्रम शाळेतील प्रश्न व मूलभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित करत आंदोलन केलं. तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाला दाद न दिल्याने संताप व्यक्त केला. “तुम्हाला माज आलाय का? मी तुमची चांगलीच जिरवतो”, अशा शब्दांत पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

आश्रमशाळेतील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात कळवणच्या एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर आमदार नितीन पवार यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यांच्याबरोबर अनेक आदिवासी नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, पाच तास ठिय्या मांडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समानधानकारक उत्तर न मिळाल्याने पवार संतापले. ते अधिकाऱ्यांना म्हणाले, “आमचं पत्र घ्यायला तुम्हाला एवढा वेळ लागतो का. लोकांच्या आंदोलनाची दखल घ्यायला दिड तास लागतो का? या लोकांनी (अधिकारी) कार्यालयाला कुलुपं लावून ठेवली होती. कोणत्या तज्ज्ञाच्या डोक्यातून हे आलं होतं ते मला जाणून घ्यायचं आहे.”

नितीन पवारांचा आक्षेपार्ह भाषेत अधिकाऱ्यांना सज्जड दम

आमदार नितीन पवार म्हणाले, “तुम्ही मला वेड्यात काढता का? आता मी बघतो, मी इथेच बसणार आहे. तुम्हा एकेकाला ***”. नितीन पवार बराच वेळ आक्षेपार्ह भाषेत अधिकाऱ्यांना दम देत होते. त्यानंतर ते म्हणाले, “तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. १ मेच्या दिवशी तुम्ही काय केलं होतं तेही लक्षात आहे. तुम्ही मला च्यु*** काढता का? मला वेड्यात काढता का? आता मी तुमच्याकडे बघणार आहे.” त्यानंतर पवार कुर्ता हातात पकडून विचित्र हातवारे करत “तुम्हाला बघून घेतो” असा इशारा देत होते.

तुमचे सगळे धंदे बंद करतो : नितीन पवार

नितीन पवार म्हणाले, “१ मे रोजी महाराष्ट्र दिनी मी इथे आलो होतो. आदिवासी आमदार म्हणून आलो. तुम्ही माझ्यासाठी काय नियोजन केलं होतं. तुम्ही शिष्टाचाराप्रमाणे झेंडावंदन केलं होतं का? तुम्हाला एवढा कशाचा माज आलाय? तुमचा माज मी जिरवतो. तुम्ही मला च्यु*** काढता का? कुलुप कसं लावायचं ते शिकवतो. आता मी प्रत्येक विभागाकडे लक्ष देणार आहे. तुम्ही काय इथे कायम राहणार नाही. मी तुमचे सगळे धंदे बंद करेन. मटका-बिटका संगळं बंद करणार.”

आश्रमशाळेला टाळं ठोकण्याचा इशारा

आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के पदं भरली जात नाही तोवर शासकीय आश्रमशाळेला टाळं ठोकण्याचा इशारा पवार यांनी यावेळी दिला. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, बाह्यस्त्रोत शिक्षकांची भरती झालेली नाही, आश्रमशाळेतील जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे, आश्रमशाळेत मूलभूत सुविधांचा आभाव आहे, अशा अनेक कारणांमुळे नितीन पवार यांनी आंदोलन केलं. तसेच या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला.