कोल्हापूर, सांगलीसह राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेली पूरपरिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री पुरापेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी करीत आहे. पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर महाजनादेश यात्रा काढावी लागली नसती, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी रूपाली चाकणकर या कोल्हापुरमध्ये आल्या होत्या. त्यांनी शहरातील कागल, मुस्लिम बोर्डिंग, चित्रदुर्ग मठ, बापट कॅम्पसह विविध भागांना भेटी दिल्या. तसेच पूरग्रस्तांशी संवादही साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या, पूरपरिस्थिती गंभीर असताना ती हाताळण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व हवाई पाहणी करून उंटावरून शेळ्या राखत आहे. मंत्री गिरीश महाजन सेल्फी काढण्यात व्यस्त आहे. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे पूरग्रस्त भागात फिरकलेल्याही नाही, अशी टीका त्यांनी केली.

अतिवृष्टीची पूर्वकल्पना मिळूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले. पुराचे नियोजनही करता आले नाही. आता पूरग्रस्तांना मदत करताना मात्र शासन त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करते. हीच सरकारची संवेदनशीलता आहे का, असा सवाल चाकणकर यांनी यावेळी उपस्थित केला. विरोधकांकडून भाजपाच्या महाजनादेश यात्रेला लक्ष्य केले जात असताना यात्रेचा २१ दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पाच दिवस उशिराने ही यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू हाेणार आहे.