संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदारयाद्यांवर हरकतींचा पाऊस पडला आहे. पालिकेच्या एकूण १५ प्रभागांतील मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याबाबत तब्बल १७३० हरकती दाखल झाल्या आहेत. त्यापैकी काही हरकती निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित सुमारे १ हजार हरकतींवर प्रांताधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या याद्यांमध्ये अनेक प्रभागांतील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे समोर आले. त्यामुळे योग्य प्रभागात आपले नाव समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी स्वतः मतदारांबरोबरच विविध पक्षीय इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी हरकती घेतल्या आहेत.
सध्या पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अकोले येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे. मुख्याधिकारी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा प्रभागांत एकूण १७३० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. दाखल झालेल्या हरकती ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन स्वरूपाच्या आहेत. ‘अ’ स्वरूपाच्या हरकतींमध्ये मतदारांनी स्वतः आपली नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याबद्दल किंवा समाविष्ट करण्याबद्दल हरकती नोंदवल्या आहेत. ‘ब’ स्वरूपाच्या हरकतींमध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी इतर मतदारांच्या नावांवर हरकती घेतल्या आहेत.
प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेल्या एकूण १७३० हरकतींपैकी, ‘अ’ वर्गातील २०० मतदारांच्या हरकती यापूर्वीच निकाली काढण्यात आल्या आहेत. इतरही काही हरकतींवर निर्णय घेण्यात आल्याने आता सुमारे एक हजार हरकतींवरच मंगळवारी प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी हरकती नोंदविलेले स्वतः मतदार, त्यांचे प्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहून आपले म्हणणे मांडतील. प्राप्त हरकतीनुसार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हरकती नोंदवलेल्या मतदारांच्या प्रभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीनंतर मतदारयादीवर अंतिम निर्णय होऊन ती प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्ह्यात संगमनेरसह कोपरगाव, राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या नगरपरिषदांसह नेवासे नगरपंचायतच्या निवडणुका प्रतीक्षेत आहेत. सध्या या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. संगमनेरमधील मतदार यादीवर यापूर्वीच काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला आहे. देशभर विरोधी पक्षांनी मतदार यादींवर अक्षेप नोंदवलेले आहेत. जिल्ह्यातील पालिका निवडणुका प्रतीक्षेत असलेल्या ठिकाणीही मतदार यादीवर अनेक हरकती दाखल होत आहेत. त्याच्या सुनावणीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे.
