अहिल्यानगर : सभासदांना लाभांश वाढवून मिळावा, कर्जाची मर्यादा वाढावी, संस्थेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे फोटो पुन्हा लावावेत, या मागणीसाठी विरोधी पुरोगामी सहकार मंडळाने आज माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर धरणे आंदोलन करीत घोषणाबाजी केली.
माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा दि. १३ जुलैला होत असून, सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक सहा कोटींच्या अनावश्यक तरतुदी करून निव्वळ नफा कमी राहील व लाभांश १० टक्के न देता फक्त ६ टक्के देऊन घाणेरडे राजकारण केले आहे. मागील संचालक मंडळाचा कारभार असला, तरी तरतुदी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केल्या आहेत. अहवालामध्ये मात्र, तरतुदीच्या पानावर सत्ताधाऱ्यांची नावे न टाकता मागील संचालक मंडळाची नावे टाकलेली आहेत. हा सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
संस्थेचा सन २०१८ मध्ये अमृतमहोत्सव झाला. त्या कार्यक्रमाचे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा समावेश असलेले छायाचित्र संस्था व सर्व शाखांमध्ये लावलेले होते. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ते काढून टाकले. ते छायाचित्र परत लावावे, कृतज्ञता निधी योजना सुरू ठेवावी आदी मागण्यांसाठी संस्थेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यात शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, वाल्मीक बोठे, काकासाहेब घुले, सूर्यकांत डावखर, उत्तम खुळे, दिलीप काटे, वैभव सांगळे, काकासाहेब पिंगळे, संजय भुसारी, संजय कोळसे, दादासाहेब चौभे, जाकीर सय्यद, प्रकाश राजुळे, मनीषा म्हस्के, श्रीमती एकशिंगे, श्रीमती एस. पी. ढोकळे, सुनील भुजाडी, विनोद जुंदरे, विशाल कोळसे आदी सहभागी होते.